विरार (प्रतिनिधी) : विरार पूर्व कांदल कंपाऊंडमधील दगडाच्या खदाणीत एका २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी १० वाजता सापडला आहे. हा तरुण मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद करून ही हत्या की आत्महत्या याचा शोध घेत आहेत.
अमनकुमार वाल्मिकी असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. विरार पूर्व कांदल कंपाऊंडमधील खदाणीत आज सकाळी या तरुणाचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत स्थानिक रहिवाशांना दिसला. याची माहिती विरार पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
बेपत्ता असणाऱ्या तरुणाची कोणी हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खदाणीत आणून टाकला का, त्याने स्वत: आत्महत्या केली आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत.