मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाडमध्ये रविवारी शासकीय विश्रामगृह मुरबाड येथे धरणग्रस्तांची सदिच्छा भेट घेण्यासाठी तसेच मुरबाडकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा दौरा मुरबाड येथे संपन्न झाला.
बारावी धरणग्रस्तातून प्रकल्पबाधित कुटुंबातील नुकत्याच ४१८ कुटुंबप्रमुखांना नोकरी देण्याबाबत महापालिकांमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून तसेच ठाणे जिल्हाधिकारी, महापालिकेतील आयुक्त व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी यांच्या समवेत झालेल्या चर्चा व सभांमधून ठरल्याप्रमाणे ४१८ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबद्दल सर्व अडचणी दूर करीत रविवारी महापालिकेतील आयुक्तांना फोनवरून चर्चा करून मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील उपायुक्त मारुती गायकवाड यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
मीरा-भाईंदर मध्ये रुजू होत असलेल्या प्रकल्पबाधितांना सोमवारपासून रुजू पत्र मिळेल तसेच ठाणे येथील महापालिका आयुक्त यांची चर्चा केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेतील रुजू होत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना आरोग्य चाचणी झाल्यानंतर रुजू पत्र मिळणार असल्याचे सांगितले. तसेच नवी मुंबई येथील महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर येथे आठवड्यात त्यांना देखील रुजू करण्यात सांगितले आहे.
धरणग्रस्त बाधित सुकाळवाडी येथील काही घरे बुडीत असताना देखील त्यांना लाभ मिळाला नव्हता. त्यांना तो देण्यात येईल. त्यामुळे एकंदरीत रविवारी झालेल्या सदिच्छा भेटीत शेकडोंच्या संख्येने आलेल्या प्रकल्प बाधितांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, बारावी धरण प्रकल्प पीडित संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ बांगर चंद्रकांत बोस्टे, रामभाऊ दळवी, दीपक खाटेघरे, अनंत कथोरे, जुगल जाखोटिया, महेंद्र पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.