पैठण : दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदी-शहांचा सहकारी होणं चांगलं. आम्हाला साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांची आम्ही त्याच साबणाने धुलाई केली, अशी खरमरीत टीका सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मुख्यमंत्री शिंदे यांची पैठणमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. बाळासाहेबाची खरी शिवसेना कोणती या प्रश्नाचे उत्तर आजच्या सभेतील गर्दीने दिले आहे. कुणी जबरदस्ती पैसे देऊन येथे आले नाही. हे लोक येथे प्रेमाने सभेसाठी आले आहेत, असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केला.
आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला, मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि आम्ही विरोधकांकडे गेलो. पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. मला भाजप, शिवसेनेच्या लोकांनी माझी स्तुती केली. मी चांगले काम करुन त्यांचा वनवास संपवला. अडीच वर्षे समाजात नकारात्मक भाव होते. आम्ही हे जाणले आणि लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी पाऊले उचलली. लोकभावनेला हात घालून दहिहंडी आणि गणेशोत्सवातील बंधने मोकळी केली. फोटो काढायला लोक माझ्याकडे येतात. मी कधीच फोटोग्राफर घेऊन जात नाही. बाकी लोक कुठे कॅमेरे घेऊन जातात मला माहीत नाही. त्यांचे त्यांनाच माहीतेय. काही लोक म्हणतात, मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेतात. पण मी सांगतो कालपर्यंत मी त्यांच्याकडे जात होतो. आज मुख्यमंत्री झालो तर मी त्यांच्याकडे का जाऊ नये. लोक मला म्हणतील की, हा बदलला. मी माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही.
मुख्यमंत्री म्हणाले, टीका करणे विरोधकांचा धंदा आहे, त्यांना टीका करू द्या. सुप्रीया सुळे म्हणाल्या की, अजित पवार पहाटे सहापासून कामाला लागतात. मी त्यांना सांगतो की, मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांचे काम करतो. चांगले काम आपल्याला करायचे आहे. एवढेच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी मला शिकवले. सर्व आपली माणसे सभेत आहेत. ते आपल्या प्रेमापोटी येतात. काही सभा मी पाहिल्या. राष्ट्रवादीचे लोक काही सभेत पाठवले जातात. आमची गर्दी तशी नाही. विरोधकांच्या शब्दकोशात फक्त खोके हेच शब्द आहेत.