उदय निरगुडकर
अर्वाचिन काळात सर्वाधिक काळ राणीपदावर बसण्याचा मान मिळवलेल्या क्वीन एलिझाबेथ द सेकंड यांचं निधन झालं. अलीकडेच ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांना त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ दिली होती. आजचा ब्रिटन ‘ग्रेट ब्रिटन’ असण्याला कारणीभूत असणाऱ्या राणीचं निधन झालं आहे. आजचं आधुनिक इंग्लंड ज्यांच्या खांद्यावर उभं राहिलं, त्यांना आम्ही गमावलं, अशा शब्दांत आदरांजली वाहिली जात आहे.
‘गॉड सेव्ह द क्वीन’ या आर्त स्वरांनी बंकींगहम पॅलेसजवळचा आसमंत भरून राहिला आहे. अर्वाचिन काळात सर्वाधिक काळ राणीपदावर बसण्याचा मान मिळवलेल्या क्वीन एलिझाबेथ द सेकंड यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. ब्रिटिश परंपरेला अनुसरून राजघराण्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे त्यांच्या मृत्यूची बातमी टप्प्याटप्प्याने जगासमोर आली. अगदी काल-परवा ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान श्रीमती लिझ ट्रस यांना त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ दिली होती. त्यानंतर लगेचच आलेल्या त्यांच्या निधनाच्या वार्तेने सर्वांना धक्का बसला. आजचा ब्रिटन ‘ग्रेट ब्रिटन’ असण्याला कारणीभूत असणाऱ्या राणीचं निधन झालं आहे. आजचं आधुनिक इंग्लंड ज्यांच्या खांद्यावर उभं राहिलं, त्यांना आम्ही गमावलं, अशा शब्दांत लिझ ट्रस यांनी आदरांजली वाहिली अन् जगभरातून शोकसंदेश येऊ लागले. कारण जगाच्या इतिहासावर सात दशकं आपल्या अस्तित्वाची मोहोर उमटवणारी दुसरी कोणतीही व्यक्ती आज हयात नाही. अशा निधनाचे राजशिष्टाचार इंग्लंडमध्ये अतिशय कडक आहेत आणि शासकीय भाषेत राणीचा मृत्यू असं न म्हणता ‘लंडन ब्रिज इन डाऊन’ अशी सांकेतिक भाषा वापरली गेली. सध्या ब्रिटन आर्थिक विवंचनेत आहेच; त्यात भर म्हणून ऊर्जेच्या समस्येला तोंड देत आहे. त्यात काल-परवा आलेली नवी पंतप्रधान. ब्रिटिश जनतेच्या अनेक पिढ्यांना राणीच्या असण्याची इतका दीर्घकाळ सवय होती की राणी मर्त्य आहे हे स्वीकारणं त्यांना जड जात आहे. या काळात चर्चिलपासून लिझ ट्रसपर्यंत १५ ब्रिटिश पंतप्रधानांना तिने शपथ दिली आणि ३० अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पाहिले.
राणी म्हणून १०० देशांचा प्रवास करत मानसन्मान मिळवला. ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नाही, या वैभवापासून ‘एकेक मोती लागे गळावया’ अशी या साम्राज्याची पडझडही त्यांनी पाहिली. वर्ल्ड ऑर्डर बदलली, जागतिक पटलावरील इंग्लंडचं स्थान बदलत राहिलं. या सगळ्यात स्थिरत्वाची आणि सातत्याची प्रतीक मूर्ती कोणती असेल तर ती म्हणजे क्वीन एलिझाबेथ सेकंड. प्रदीर्घ कारकीर्द हे जसं त्यांचं वैशिष्ट्य तसंच सामान्य व्यक्तिमत्त्वातून कठीण प्रसंगी दिसलेलं असामान्यत्व हे त्यांचं खरं वैशिष्ट्य. लहानपणी लिलीबेट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या राणीची ही गोष्ट ती दहा वर्षांची असताना १९३६ मध्ये सुरू झाली. तोपर्यंत तिला विशेष महत्त्व नव्हतं. बाल्टीमोरमधल्या घटस्फोटितेबरोबर लग्न करायचा निर्णय ब्रिटनचे सम्राट असलेल्या तिच्या काकानं जाहीर केल्यानंतर त्यांना पदच्युत व्हाव लागलं अन् एलिझाबेथचे वडील इंग्लंडचे राजे बनले. हे न घडतं तर कोणा अमीर उमरावांच्या श्रीमंत खानदानात लिलीबेट सून म्हणून सुखाने नांदली असती.
एलिझबेथचं जीवन टिपीकल इंग्लिश श्रीमंत कुटुंबात असणाऱ्या महिलेसारखं खासगी राहिलं असतं. यात बागकाम, घोडे, कुत्रे, चहा पार्ट्या, समारंभाची जेवणं यात ती एक शो पीस बनून राहिली असती. पण नियतीनेच तिला राणीपदासाठी निवडलं. काहीसं तिच्या इच्छेविरुद्धच. मग सुरू झालं राणी बनण्याचं खडतर प्रशिक्षण. शाळासुद्धा घरच्या घरी. त्यामुळे शाळासोबती नाहीत, खेळायला, हुंदडायला, बागडायला कुणी नाही. जवळची मैत्रीण म्हणजे धाकटी बहीण मार्गारेट रोझ. प्रथम तिची ती ताई बनली. पुढे नियतीने तिला इंग्लंडची क्वीन बनवलं. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा लिलीबेट १३ वर्षांची होती अन् युद्धाचे काटकसरीचे चटके तिनेही भोगले. त्याच वेळी ती ग्रीसच्या डच वंशीय रुबाबदार, देखण्या राजपुत्राच्या प्रेमात पडली अन् पुढे त्यांचं लग्न झालं. प्रिन्स फिलीप हे देखणे होते अन् रंगेलही. त्यांच वर्णन ‘ब्लॉंड व्हायकिंग’ असं केलं गेलं. पतीशी जेवढे प्रेमाचे क्षण तेवढेच संघर्षाचेही. अर्थात तिने हे सर्व पेललं एक राणी म्हणून. १९५० च्या काळात दुसऱ्या महायुद्धात होरपळलेल्या ब्रिटिश जनतेला एक ग्लॅमरस कपल हवं होतं. ती गरज या दांपत्यानं पूर्ण केली. १९५२ मध्ये आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना अनपेक्षितपणे वडिलांच्या निधनाची बातमी समजली अन् एका क्षणात लिलीबेटची महाराणी झाली. त्याच काळात ब्रिटनमध्ये टेलिव्हिजनच युग सुरू झालं होतं. तिचा राज्याभिषेक लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला. हे या आधी घडलं नव्हतं. पुराणमतवाद्यांचा, चर्चचा विरोध होता. पण तिने आणि तिच्या नवऱ्याने राणीपदाच्या चौकटीत राहून तो मोडून काढला.
ती राणी झाली तेव्हा ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य जवळपास मावळत होता. निम्म्या पृथ्वीवर राज्य करणारं हे राजघराणं… त्याचा पडझडीचा काळ. साम्राज्य लयाला गेलं; परंतु साम्राज्य ते कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकूल असा प्रवास तिने कौशल्याने केला. ५६ देशांचं संघटन तिने चतुराईने साधलं. गुणांनी तिच्या कित्येक पटींनी वरचढ असलेल्या अनेक नेत्यांशी तिने आत्मविश्वासाच्या बळावर उत्तम संबंध ठेवले. त्यामुळे इतकी दशकं ती ब्रिटनच्या जनतेच्या आदराला पात्र झाली. परंतु तिचं वैयक्तिक आयुष्य वादळी होतं. एकीकडे पती फिलीपचं रंगेल आयुष्य. त्यामुळे तळमळत काढलेल्या एकांत रात्री, दुसरीकडे राजघराण्याचे विरोधक आक्रमक. तरीदेखील आपल्या सामंजस्याच्या बळावर तिने पतीलाही वठणीवर आणलं. पण याच काळात एका कोमल राजकन्येचं रूपांतर पोलादी हृदयाच्या आणि चेहऱ्याच्या राणीत कधी झालं ते तिलाच कळलं नाही. नियतीने दिलेलं राणीपद राखण्यासाठी तिने अपार कष्ट केले आणि अनेक क्षणी कुटुंबापेक्षा राजघराण्याला औक्षण करण्यात धन्यता मानली. सुमार सामान्यज्ञान असतानाही विलक्षण कॉमनसेन्सच्या आधारे तिने अचंबित करणारे निर्णय घेतले. जे पुढे ब्रिटनसाठी योग्य ठरले.
राणीचे स्वतःच्या मुलांशी असणारे संबंध तणावपूर्ण होते. विशेषतः प्रिन्स चार्ल्स. त्याचा डायनाशी घटस्फोट, पुढे तिचा मृत्यू. त्या दोघांच्या आयुष्यात असणारी कॅमिला पार्कर. या सर्व प्रकरणात राणी कशी वागते याकडे मीडिया निर्दयपणे लक्ष पुरवत होती. त्या काळात डायनाच्या मृत्यूच्या वेळी आधी कॅमिलाच्या विरोधात असणारं वातावरण ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीच्या विरोधात गेलं. ख्रिश्चन धर्मावर गाढ श्रद्धा असणाऱ्या राणीने हार मानली नाही. १९९२ हे वर्ष तिच्यासाठी महाभयंकर होतं. आधी चार्ल्स-डायनाचा घटस्फोट झाला. प्रिन्स ऍन्ड्रयू आणि राजकन्या ऍन यांच्या आयुष्यातल्या वैयक्तिक वादळांनी राजघराण्याला हादरे बसले. उलटसुलट मतप्रवाह आले. प्रचंड टीकेचं धनी व्हावं लागलं आणि अनेक शतकं जपलेल्या विंडसर कॅसल या घराला प्रचंड मोठी आग लागली. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेली राणी अधिक नि:शब्द, अधिक रिझर्व्ह बनली. पुढे राजपूत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांनी राजघराण्याचा त्याग केला. डायनाने जी कारणं दिली, तीच त्यांनीही दिली. राजवाड्यातली भावनाशून्य वागणूक वगैरे. त्यावर तिने चकार शब्द काढला नाही.
अर्थातच आता पुढे काय, राजगादीचा वारस कोण, त्याच्यासमोरची आव्हानं काय? ज्येष्ठ पूत्र म्हणून प्रिन्स चार्ल्स आता समारंभपूर्वक इंग्लंडचे राजे बनतील. पूर्व इतिहास आणि कमजोर व्यक्तिमत्त्व पाहता त्यांना क्वीनची लोकप्रियता लाभणार नाही, हे उघड आहे. मग घटनात्मक राजेशाही कायम राहणार का? हे प्रश्नचिन्ह ठेऊन राणी गेली. चार्ल्स यांची स्वतःची ठाम राजकीय मतं आहेत. तशी ती राणीलाही होती. पण त्यांनी ती जाहीर न करण्याची दक्षता बाळगली. एकविसाव्या शतकात जगाच्या नकाशात, व्यवस्थेत प्रचंड बदल घडले आहेत. त्यात अचल होती ती क्वीन एलिझाबेथ. म्हणूनच ती ब्रिटनच्या अस्तित्वाचं, अस्मितेचं प्रतीक होती. ज्या बालमोरल इथल्या राजवाड्यात तिने आपलं बालपण घालवलं तिथूनच तिचं पार्थिव अंतिम प्रवासासाठी निघालं. काय सांगतो हा जीवनप्रवास? आदर राखून कर्तव्य कसं पार पाडावं, आब राखून लोकांना आपलंसं कसं करावं… भावनेचं प्रदर्शन न करताही त्यांच्या कौतुकास पात्र कसं व्हावं या गुणांचा हा प्रवास. परंपरेचा, नवतेचा आणि सातत्याचा प्रवास… तिची कित्येक भाषणं ऐकायला मिळाली. विशेषतः कोरोनाकाळात संपूर्ण जग विस्कळीत झालेलं असताना ब्रिटिश जनतेला धैर्य देण्यासाठी तिने उच्चारलेले शब्द आज आठवताहेत. ती म्हणाली होती, ‘वुई वील मीट अगेन’. अशी राणी आमच्या आयुष्यात पुन्हा होईल की नाही याविषयी शंका आहे. आपल्या कारकिर्दीला ७० वर्षं पूर्ण केली तेव्हा तिने ब्रिटिश जनतेला एक पत्र लिहिलं होतं. त्याखाली सही होती, तुमची सेवक एलिझाबेथ द सेकंड… नागरिकांना दर्शन देण्यासाठी बंकिंगहम पॅलेसच्या त्या गॅलरीत ती आता दिसणार नाही कारण राजघराण्याने आपला आत्मा गमावला आहे.