नाशिक (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र तरीदेखील नाशिक शहरातील काही भागात पाणी प्रश्न गंभीर झाल्याने नागरिकांना आज हंडा मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, अमोल दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनपावर भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन देण्यात आले. तसेच, या सर्व समस्या आठ दिवसात न सोडविल्यास सर्व नागरिकांना सोबत घेऊन जन आंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासक तथा आयुक्त साहेब जबाबदार असतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
नाशिकसह शहर परिसरात पावसाने दमदार पुरागमन केले आहे. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी शहर परिसरात तब्बल ८६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर पावसाची संततधार सुरूच आहे. असे असताना नाशिक शहरातील सातपूर परिसरात अनेक दिवसांपासून पाणी प्रश्न गंभीर झाल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपावर सातपूर परिसरातील नागरिकांनी हंडा मोर्चा काढला असून भाजप नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
एकीकडे नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सद्यस्थितीत गंगापूर धरण ९० टक्क्यांच्यावर भरले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही धरणे तुडुंब भरली आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरल्याने पुढील काही काळासाठीचा पाणी प्रश्न मिटला आहे. असे असताना शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने ग्राहकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला शहरात ढगफुटी होत आहे.
शहरातील रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांचे घसे कोरडेच असल्याचे चित्र दिसत आहे. पाणी आहे मात्र पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना पाण्या वाचून दिवस काढावा लागत असल्याची खंत नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली. त्यामुळे नाशिक मनपाचा भोंगळ कारभार व व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिक याविषयी मनपाशी संवाद साधत होते. मात्र यास प्रतिसाद मिळत नव्हता. शहरात अनेक ठिकाणी पाणी येत नसून नागरिक आता कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यामुळे भाजप नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नाशिक मनपावर हंडा मोर्चा काढला. यावेळी पाणी प्रश्न कधी सोडवणार? तसेच नागरिकांच्या समस्यांकडे मनपा लक्ष कधी देणार? असे सवाल यावेळी आंदोलक नागरिकांनी केला. याप्रसंगी माजी सभागृहनेता दिनकर आण्णा पाटील, भाजपा सरचिटनीस जगन पाटील, माजी नगरसेविका लता दिनकर पाटील, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल दिनकर पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर आदी शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पालिकेवर प्रशासक आल्यापासून समस्या…
गेल्या वीस वर्षात कधीही नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली नाही, ती आज मितीस जाणवत आहे. ही समस्या नाशिक महानगरपालिकेवर जेव्हापासून प्रशासक नियुक्त झाले तेव्हापासून जाणवत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. पाणीपुरवठा अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
धरण उशाशी मात्र…
नाशिक महानगरपालिकेतील शिवाजीनगर, श्रमिकनगर, ध्रुवनगर, गंगापुर, अशोकनगर, धर्माजी कालॅनी हा परिसर गंगापूर धरणाच्या उशाशी असून सुद्धा व याच ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र असूनही येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सावळा गोंधळ चालू आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी सभागृहनेते दिनकर अण्णा पाटील व अमोल दिनकर पाटील यांच्या वतीने नाशिक महापालिकेवर शेकडो महिलांना सोबत घेत हंडा मोर्चात सहभागी झाल्या होत्या.