जगावर चालून आलेल्या महाभीषण कोरोना महामारीच्या संकटामुळे लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधांच्या २ वर्षांच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच आलेला गणेशोत्सव मुंबई, ठाणे, पुणे, कोकण आणि अवघ्या महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या जल्लोषात, उत्साहात पार पडला. विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे १० दिवसांच्या वास्तव्याच्या काळात गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दोन वर्षांच्या खंडानंतर विशेषत: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्ताला गेल्यावर आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारच्या धडाडीमुळे सर्व हिंदू सणांवरील निर्बंध हटविण्यात आले. त्यात आलेल्या पहिल्याच गोकुळाष्टमीच्या सणाला म्हणजेच गोविंदांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. यंदा गोविंदांचा उत्साह पाहिल्यावर त्यानंतर येणारा गणेशोत्सव किती व्यापक आणि भव्य स्वरूपात साजरा होणार याचा अंदाज आलाच होता. त्यातच काही दिवसांनी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमुळे यंदाच्या गणेशोत्सवावर त्याचे प्रतिबिंब उमटणार याची खूणगाठ आधीच बांधली गेली होती. त्यामुळे गणेशाेत्सवात मंडपांमध्ये आणि सर्वत्र करण्यात आलेल्या सजावटींमध्ये, बॅनरबाजीत वििवध राजकीय पक्ष आणि त्याचे विद्यमान नेते आणि भावी नेते यांची मोठमोठाली पोस्टर्स पाहायला मिळाली. तसेच या सजावटींवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेले दिसले. असा सर्व मोठा गाजावाजा आणि कोलाहलात आपल्या भक्तांना भेटावयास आलेल्या बाप्पांना तेव्हढ्याच जल्लोषात, भक्तिभावात नुकताच भावपूर्ण निरोप देण्यात आला.
मुंबईतील नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचे, चिंचपोकळीच्या चिंतामणीचे, गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाचे अशा मोठ्या नावाजलेल्या मंडळांच्या गणेशांचे विसर्जन मोठ्या धमाक्यात झाले. जड अंतकरणाने भक्तांनी या सर्व राजांना निरोप दिला असला तरी कोरोनामुळे दोन वर्षे ‘सायलेंट’वर गेलेली गणेश विसर्जन मिरवणूक यंदा ‘कर्णकर्कश्य’ आणि कानठळ्या बसविणारी ठरली. मिरवणुकीच्या दोन दिवसांत लक्ष्मी रस्त्यावर उच्चांकी आवाजाची नोंद झाली. ढोल-ताशांचा दणदणाट आणि स्पीकरच्या भिंती निर्बंधमुक्त असल्याने काही चौकांमध्ये आवाजाच्या पातळीने ‘अतिधोकादायक’ची पातळी गाठली. तब्बल २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. यंदाच्या मिरवणुकांमध्ये निर्बंध नसल्यामुळे मुंबई – पुण्यातील अनेक मंडळांकडून ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडण्यात आल्याचे दिसले. पुणेकरांनी यंदा मिरवणुकीचा विक्रम मोडला आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तर विक्रमी ३० तास चालली. गंमत म्हणजे शेवटचे मंडळ जेव्हा टिळक चौकात आले, त्यानंतर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी आपल्यावरील ताण कमी केला आणि चक्क डीजेच्या तालावर डान्स केला. याआधी २०१४ मध्ये २९ तास १२ मिनिटे मिरवणूक चालली होती. त्यानंतर या वर्षी विक्रमी वेळ नोंदवत पुण्यात ३० तास मिरवणूक चालली. दरवर्षीपेक्षा यावर्षी मिरवणुकीला उशीर झाल्याने पोलीसही या दिरंगाईला वैतागलेले दिसले. पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ गणेश मंडळ कुमठेकर रस्त्यावरून दोन तास जागेवरून हललेच नाही. म्हणून स्वतः पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मंडळाचा डीजे बंद करण्यासाठी गेले. डीजेच्या आवाजाने पेठा दणाणून गेल्या. गणपती विसर्जन मिरवणुकीत तरुणाई बेधुंद होत थिरकली. महिला, मुली, तरुणांचा मोठा उत्साह मिरवणुकीत दिसून येत आहे. दोन वर्षांनंतर राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाल्याने गणेशभक्तांनी यंदा बाप्पांच्या चरणी भरभरून दान केले असल्याने यंदा बाप्पानेच व्यापाऱ्यांना भरभरून दिल्याचे दिसले. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच बाजारपेठेतील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली असून यंदा राज्यात तब्बल नऊ हजार कोटींची उलाढाल झाली आहे.
कोरोनाने महागाईने उच्चांक गाठला होता. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत होते. पण दोन वर्षांनी बाप्पा आले आणि बाजारपेठांतील सगळी मरगळच दूर झाली. महाराष्ट्रात ३० टक्क्यांनी मार्केटमधली उलाढाल वाढली आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीत गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक व्यापार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावर दसरा आणि दिवाळीत ७५ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त विक्री होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या वर्षीचा गणेशोत्सव तर मिठाईवाल्यांना जास्तच गोड झालेला दिसला. कारण मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्के जास्त उलाढाल झाली आहे. खाद्य तेलाच्या मागणीतही गणेशोत्सवात वाढ झाली आहे. दरवर्षी देशात १४ ते १५ हजार कोटींची खाद्य तेलाची उलाढाल होत असते. प्रामुख्याने सणासुदीत ही मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ही मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात वार्षिक दीड हजार कोटींची उलाढाल होत असते. अशात गणेशोत्सवाच्या काळात राज्यात अंदाजे ६० कोटींहून अधिकची खाद्य तेलाची उलाढाल झाली. बाजारात सतत होत असलेली वाढ आणि साठा उपलब्ध होत असल्याने बाजारातील मरगळ दूर होत आहे. त्यामुळे बाप्पा हा यंदा खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता ठरला असून ज्याने बाजारावरचे मंदीचे विघ्न दूर केले आहे, असे म्हटले पाहिजे. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली, पाणावल्या डोळ्यांनी बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला असला तरी या सर्व उत्सवात भक्तांनी थोडे तारतम्य आणि संयम बाळगला असता तर अनेक गोष्टी टाळता आल्या असत्या याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे.