
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुप्रतिक्षीत अशा आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली. दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतलेल्या आणि भारतीय गोलंदाजीची धार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे. रोहित शर्माकडे संघाच्या कर्णधारपदाची तर केएल राहुलच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल असा भारतीय संघ असेल. मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर यांना राखीव खेळाडू म्हणून संधी दिली आहे. भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहेत. अर्शदीपलाही संघात जागा दिली आहे.
आगामी टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नामिबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि यूएई या संघांनी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. त्यानंतर आता नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी क्वालिफायर टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचून टी-२० विश्वचषक २०२२ साठी आपली जागा पक्की केली आहे. आशिया कप २०२२मध्ये भारतीय संघ खास कामगिरी करू शकला नाही. जसप्रीत बुमराहची कमतरता भारतीय संघाला जाणवली. मात्र आता दुखापतीतून सावरल्यामुळे जसप्रीत बुमराहचे या स्पर्धेकरिता पुनरागमन झाले आहे. भारतीय संघासाठी ही आनंदाची बातमी आहे.