मुंबई (वार्ताहर) : बीकेसीमध्ये प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता बेस्टने प्रिमियम बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीपासून बेस्ट उपक्रमांतर्गत बीकेसी ते ठाणे या मार्गावर प्रिमियम बससेवा धावणार आहे. बेस्टच्या प्रवाशांना मोबाईल अॅपवर तिकीट बुकिंग केल्यावर प्रिमियम बसमध्ये आरक्षित सीट मिळणार आहे.
वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसीमध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस असल्यामुळे येथून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची खूप गर्दी असते. प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्ट प्रशासनाने पुढाकार घेतला असून २६ सप्टेंबरपासून बेस्ट उपक्रमांतर्गत बीकेसी ते ठाणे या मार्गावर प्रिमियम बससेवा सुरू करण्यात येणार आहे. बेस्टच्या प्रवाशांना मोबाईल अॅपवर तिकीट बुकिंग केल्यावर प्रिमियम बसमध्ये आरक्षित सीट मिळणार आहे. २ हजार लक्झरी बसेसचा ताफा बेस्ट उपक्रमामध्ये सामील होणार असून पहिल्या टप्प्यात २०० बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या बससेवेचे दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत. परंतु ओला-उबेर तसेच सामान्य टॅक्सीपेक्षा याचे तिकीट दर कमी असतील, असे आश्वासन उपक्रमाकडून देण्यात आले आहे.
वांद्रे ते ठाणे या मार्गावर प्रिमियम सेवा सुरू केल्यानंतर पवई ते दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई ते दक्षिण मुंबई या मार्गावर बेस्टचा विस्तार करण्यात येईल. या सगळ्या बसेस वातानुकूलित असून बसमध्ये तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी खास अॅप तयार केले जाणार असून, यात सीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बस कुठे आहे? याचा ट्रॅक सुद्धा प्रवासी घेऊ शकतात. बसमध्ये किती गर्दी आहे? याचीही माहिती मिळेल. हा आरामदायी प्रवास असून प्रवासी आपले लॅपटॉप, मोबाईल फोन सुद्धा चार्ज करू शकतात, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले.
सीएसएमटी, नरिमन पॉइंट, ठाणे, मिरा रोड, बीकेसी, पवई, लोअर परळ या मार्गावर या बसेस धावतील. या प्रिमियम बसचे तिकीट सर्वसाधारण व वातानुकूलित बसेसपेक्षा अधिक असेल मात्र ओला, उबेरपेक्षा स्वस्त असेल.