Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीखारघरमध्ये स्कूल बसला लागली आग; वाहकाच्या सतर्कतेमुळे विद्यार्थी बचावले

खारघरमध्ये स्कूल बसला लागली आग; वाहकाच्या सतर्कतेमुळे विद्यार्थी बचावले

पनवेल (वार्ताहर) : खारघर येथे एका स्कूल बसला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वाहकाच्या सतर्कतेमुळे त्याने गाडीतील तिन्ही विद्यार्थ्यांना प्रसंगावधान राखीत बस मधून खाली उतरवल्याने पुढील दुर्घटना टळली आहे.

सिबीडी, बेलापूर येथील पिपल्स सोसायटीची ही स्कूल बस आहे. १२ सप्टेंबर दुपारी १२ च्या सुमारास खारघर वसाहतीमधील सेक्टर १५ घरकुल सोसायटी ते गुडवील इमारत येथून विद्यार्थ्यांना घेऊन ही बस पुढे जात असताना अचानकपणे बस मधून धूर येऊ लागल्याने बसमध्ये काहीतरी अनर्थ झाल्याचे बसचालकाच्या लक्षात आले व त्याने क्लिनरच्या मदतीने बस बाजूला घेऊन आतील विद्यार्थ्यांना प्रथम तातडीने बाहेर काढले व त्यांना सुरक्षित जागी उभे केले. त्यानंतर परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. काहींनी त्वरित अग्निशामक दलाला कळवले असताना काही वेळातच त्यांचे पथक घटना स्थळी दाखल होऊन त्यांनी शर्तीचे प्रयत्न करुन त्वरीत आग विझवली.

या आगीत काही काळासाठी आगीच्या धुराचा लोळ परिसरात पसरला होता. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. स्कूल बसला आग लागल्याची माहिती मिळताच खारघर पोलिसांचे पथक, वाहतूक शाखेचे पथक व पालकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आपली मुले सुखरूप असल्याचे पाहून पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. गेल्या काही महिन्यापासून पनवेल व नवी मुंबई परिसरात वारंवार होणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -