मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याविषयी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना नोकरीत संधी
याव्यतिरिक्त कोविड काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना नोकरीत फायदा मिळावा यासाठी गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे कंत्राटी कामावर असलेले वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अशी कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी जेणे करून भरतीच्या वेळी अशा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा तसेच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी असेही ठरले.
'राष्ट्रनेता से राष्ट्रपिता'
याशिवाय, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'राष्ट्रनेता से राष्ट्रपिता' हा सेवा पंधरवडा राबवणार असल्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. नागरिकांचे अर्ज व तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्याचसोबत कोविड लसीचा बूस्टर डोस द्यायची मोहीमही वेगाने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मंत्रिमंडळातील अन्य निर्णय
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार.
- अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार, नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण.
- नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करण्यास मान्यता.
- नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता.
- महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ.
- केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करण्यासाठी योजना राबविणार.