इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये मानवतेचे दर्शन अनुभवास मिळाले आहे. येथील मंदिरामध्ये ३०० मुस्लिमांना आश्रय दिल्याच्या घटनेमुळे मानवतेचा एक अनुभव आला आहे. पाकिस्तानला पूरस्थितीचा जबर फटका बसला आहे. नारी, बोलन व लहरी नद्यांना पूर आल्यामुळे गावाचा इतर प्रांताशी असलेला संपर्क तुटला आहे. यामुळे दुर्गम भागातील नागरिकानी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे घर सोडले आहे. या पुराचा १०० खोल्यांच्या बाबा माधोदास मंदिराला कोणताही फटका बसला नाही. या मंदिरात सर्वच पूरग्रस्त व मुक्या प्राण्यांना आसरा दिला आहे.
स्थानिक नागरिक मदतीसाठी दारोदार भटकत आहेत. ही स्थिती पाहता बलूचिस्तान प्रांतातील कच्छी जिल्ह्यातील छोट्याशा जलाल खान गावातील एका मंदिराने सर्व पूरग्रस्तांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मंदिराने जवळपास २०० ते ३०० पूरग्रस्तांना अन्न-पाणी व निवारा दिला आहे. यात बहुतांश मुस्लीम पूरग्रस्तांचा समावेश आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, बाबा माधोदास एक हिंदू संत होते. त्यांच्यावर या भागातील हिंदू-मुस्लिमांची अपार श्रद्धा होती. भाग नारी तहसीलमधून या गावात येणारे इल्तफ बुजदार सांगतात की, ते उंटावरून प्रवास करत होते. त्यांच्यासाठी धर्मापेक्षा मानवता सर्वात महत्वाची होती.
जलाल खानमधील हिंदू समुदायाचे बहुतांश सदस्य रोजगार व अन्य संधींसाठी कच्छीच्या अन्य शहरांत धाव घेतात. काही कुटुंब या मंदिराच्या देखभालीसाठी येथेच राहतात. भाग नारी तहसीलचे एक ५५ वर्षीय दुकानदार रतन कुमार सध्या या मंदिराचे प्रभारी आहेत. इसरार मुघेरी नामक डॉक्टरचे येथे वैद्यकीय शिबिर सुरू आहे. येथील हिंदू बांधवांनी मुस्लिमांना मंदिरात येऊन आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.