कल्याण (वार्ताहर) : महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील आणि स्वच्छता निरीक्षक धात्रक व त्यांच्या पथकाने ब प्रभाग क्षेत्र परिसरातील साई चौक, गोदरेज हिल, खडकपाडा परिसरात पाहणी करून एकल प्लास्टिक वापरणाऱ्या तीन फेरीवाल्यांकडून प्रत्येकी ५ हजार प्रमाणे १५ हजार दंड वसूल केला.
उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक, व्यापारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून १३०० रुपये दंड वसूल केला. उपायुक्तांच्या या कारवाईचा बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडे यांनी स्वागत केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात एकल प्लास्टिक वापर व साठवणुकीवर तसेच उघड्यावर कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. एकल वापर प्लास्टिक बंदी अंतर्गत पहिल्यावेळी ५ हजार, दुसऱ्या वेळी १० हजार व तिसऱ्या वेळी २५ हजार इतकी दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी दंडात्मक तरतूद आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगर पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत करण्यात आले आहे.
तर उपायुक्त अतुल पाटील यांनी पाहणी करत केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांनी ही कारवाई अशीच चालू ठेवावी जेणेकरून प्लास्टिक बंदी यशस्वी होईल. सर्व नागरिकांनी देखील एक पाऊल पुढे टाकून प्लास्टिक वापर टाळावा व महानगरपालिकेला सहकार्य करावे. कल्याण शहर स्मार्ट सिटी व कचरा मुक्त करायचे असेल तर अशा कार्यक्षम घनकचरा उपआयुक्त यांना साथ देणे गरजेचे असल्याचे मत बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्था अध्यक्ष सुनील घेगडे यांनी व्यक्त केले.