डॉ. सुकृत खांडेकर
दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेस पक्षाने बऱ्यापैकी गर्दी जमवली होती. हरयाणातून भूपिंदरसिंग हुड्डा आणि राजस्थानातून अशोक गेहलोत यांनी गर्दी जमविण्यात पुढाकार घेतला होता. राहुल गांधींची सभा कशासाठी आहे, भारत जोडो म्हणजे काय, हे ठाऊक नसलेली गर्दी जमवून काँग्रेसला काय लाभ मिळणार, हे सोनिया व राहुलच जाणोत…. रामलीला मैदानावरील सभेने मीडियातून प्रसिद्धी मिळाली पण पक्षाला नवीन दिशा मिळाली का? निवडणुकीत पाठोपाठ होणारे पराभव आणि मोठमोठ्या नेत्यांनी काँग्रेसला केलेला अलविदा यातून काँग्रेसला संजीवनी मिळेल, असे या रामलीलावरील सभेतून काही मिळाले नाही. भारत जोडो यात्रेची घोषणा अगोदरच झाली होती. पण काँग्रेस जोडोसाठी राहुल काय करणार, यावर बोलत नाहीत. एकेकाळी काँग्रेस पक्षाने लोकसभेत ४००च्या वर जागा जिंकल्या होत्या. आता हीच संख्या पन्नासपर्यंत खाली घसरली आहे. नजीकच्या भविष्यात नेतृत्व परिवर्तनाची शक्यता दिसत नाही आणि पक्षाला ऊर्जा देणारे नेतृत्वही नाही, मग मोदी-शहांच्या बलाढ्य भारतीय जनता पक्षाशी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस कसा मुकाबला करणार? आटा किलोमध्ये विकला जातो की लिटरमध्ये हे जर ठाऊक नसेल, तर राहुल गांधी पक्षात तरी काय उमेद निर्माण करणार?
काँग्रेस पक्ष स्वबळावर भाजपला देशपातळीवर पर्याय ठरू शकत नाही, हे सोनिया गांधी व राहुल यांना चांगले ठाऊक आहे. पण प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन राजकारण करणे त्यांना कमीपणाचे वाटते. एवढेच नव्हे, तर भाजपशी केवळ काँग्रेसच लढू शकते, प्रादेशिक पक्षांना विचारधारा नाही, असे सांगून त्यांना कमी लेखण्याचे काम माय-लेक करीत आहेत. विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाहीत आणि मीडियाचा गळा घोटला जात आहे, असे मोदी सरकारवर गुळगुळीत आरोप करायची राहुल यांना सवयच लागली आहे. राहुल न्यायपालिकांवरही आरोप करीत असतात. विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात असेल, तर राहुल रामलीला मैदानावर किंवा मोदी-शहांच्या गृह राज्यात अहमदाबाद येथे सभा घेऊन त्यांच्यावर वाटेल तसे आरोप करू शकले असते का? मीडियाचा गळा घोटला जात असेल, तर सोनिया, राहुल, ममता, नितीशकुमार, केजरीवाल, शरद पवार, फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना वारेमाप प्रसिद्धी मिळाली असती का? महागाई प्रचंड झाली म्हणून राहुल गळा काढत फिरत आहेत. पण त्यांना शेजारी देशांमध्ये अन्न-धान्य, पेट्रोल-डिझेल, भाज्या फळे यांचे दर भारताच्या दुप्पट-तिप्पट आहेत, हे ठाऊक नाही का? शेजारी देश आर्थिक विवंचनेत आहेत. तुलनेने भारतात अर्थव्यवस्था बरीच रुळावर आहे, हे राहुल यांना कोणी सांगत नाही का?
गेल्या आठ वर्षांत काँग्रेसचा त्याग करून किती मोठे नेते बाहेर पडले, भाजपमध्ये किती गेले, याची यादी प्रसिद्ध झाली, तर काँग्रेसला ती नामुष्की ठरेल. काँग्रेस पक्ष सोडून जाणारे ९० टक्के नेते पक्षाच्या नेतृत्वावर विशेषत: राहुल गांधी यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून निघून गेले आहेत. कोणाच्या भरवशांवर काँग्रेसमध्ये राहायचे, याचे उत्तर पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांकडेही नाही. सारे आयुष्य काँग्रेससाठी वेचलेल्या गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा त्याग केला तेव्हा कोणाला फारसे आश्चर्य वाटले नाही. आज ना उद्या हे होणारच होते, अशीच अटकळ सर्वांनीच बांधली होती. राहुल गांधी अनुभवातून काही शिकत नाहीत, कामात सातत्य नाही आणि सल्लामसलत करून निर्णय घेत नाहीत, हाच प्रमुख आक्षेप आहे. १९६७ मध्ये काँग्रेसला पक्षातून फुटून बाहेर निघालेल्या मोठ्या नेत्यांकडूनच मोठे आव्हान मिळाले होते. पण त्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या ५२० पैकी २८३ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. १९६९ मध्ये काँग्रेस दुभंगली. कामराज व मोरारजींसारखे नेते काँग्रेस (ओ), तर इंदिरा गांधी व बहुसंख्य खासदार काँग्रेस (आर) मध्ये विभागले गेले. १९७७ मध्ये काँग्रेस ओ जनता पार्टीत विलीन झाली, तर १९७८ मध्ये इंदिरा गांधींचा पक्ष काँग्रेस (आय) बनला. सहा वर्षांनी १९८४ मध्ये निवडणूक आयोगाने काँग्रेसला मान्यता दिली. १९९६ मध्ये काँग्रेसच्या पक्षाच्या नावातून आय (इंदिरा) शब्द हटविण्यात आला आणि इंडियन नॅशनल काँग्रेस या नावाचे पक्ष ओळखला जाऊ लागला.
स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस पक्षात दोन वेळा फूट पडली होती. १९२३ मध्ये सीआर दास व मोतीलाल नेहरू यांनी स्वराज पार्टी स्थापना केली होती. १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी सार्दुल सिंह व शील भद्र यांना बरोबर घेऊन अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा जेबी कृपलानी वेगळे झाले व त्यांनी किसान मजदूर प्रजा पार्टी स्थापन केली, तर एन. जी. रंगा यांनी हैदराबाद स्टेट पार्टी उभारली. सौराष्ट्र खेडूत संघही तेव्हाच स्थापन झाला. १९५६ मध्ये सी. राजगोपालचारी यांनी इंडियन नॅशनल डेमॉक्रॅटिक पार्टीची निर्मिती केली.
सन १९५९ मध्ये बिहार, राजस्थान, गुजरात व ओरिसामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. काँग्रेस फुटीची मालिका पुढेही चालूच राहिली. १९६४ मध्ये के. एम. जॉर्ज यांनी केरळ काँग्रेस स्थापन केली. १९६७ मध्ये चौधरी चरणसिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भारतीय क्रांती दल स्थापन केले व नंतर लोकदल नावाचा पक्ष स्थापन केला. पक्षातून अनेकजण बाहेर पडले व काहीजण काँग्रेसमध्ये परत आले. प्रणब मुखर्जी, अर्जुन सिंग, माधवराव शिंदे, नारायण दत्त तिवारी, पी. चिदंबरम, तारीक अन्वर हे काँग्रेस सोडून गेले व काही काळाने पुन्हा पक्षात परतले. मात्र ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), मुफ्ती मोहंमद सईद (पीडीपी), अजित जोशी (छत्तीसगड), जगनमोहन रेड्डी (वायएसआर काँग्रेस) आदी नेत्यांनी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकवला व स्वत: पक्ष स्थापन करून आपली वेगळी ओळख कायम ठेवली. गेल्या आठ वर्षांत म्हणजेच केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. ज्योतिरादित्य शिंदे, जतीन प्रसाद, नारायण राणे, हार्दिक पटेल, सुनील जाखड, चौधरी वीरेंद्र सिंग, रिता बहुगुणा जोशी अशी मातब्बर नावे सांगता येतील. पंजाबात माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमिरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस असा स्वत: वेगळा पक्ष काढला. गुलाम नबी आझाद यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा पक्ष स्थापन करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पक्षांतराचे सर्वात मोठे उदाहरण १९८० मध्ये घडले. २१ जानेवारीला हरयाणाचे नेते भजनलाल हे आपल्या समर्थकांसह इंदिरा गांधी यांना दिल्लीत जाऊन रात्री भेटले. त्यांच्या गटाला काँग्रेसमध्ये सामील करण्यास मंजुरी घेतली. आदल्या दिवशी राज्यात जनता पार्टीचे सरकार होते, दुसऱ्या दिवशी सकाळी सरकारचे काँग्रेसमध्ये रूपांतर झालेले बघायला मिळाले. अख्ख्या मंत्रिमंडळासह विधिमंडळ पक्षच भजनलाल यांनी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा भीम पराक्रम करून दाखवला होता.
स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसमधून बाहेर पडून नेत्यांनी स्थापन केलेल्या छोट्या पक्षांची संख्या ६० तरी असावी. पक्ष कार्यकर्त्यांना काय वाटते, जनभावना काय आहेत, याचा विचार न करता हायकमांड निर्णय घेत असते त्याचा परिणाम पक्ष फुटीची मालिका चालू राहते. वर्षअखेरीस गुजरात व हिमाचल प्रदेश, सन २०२३ मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, नागालँड, मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. तेलंगणा वगळता सर्वत्र काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत असणार आहे. गुजरातमध्ये केजरीवाल यांच्या आपला जेवढे यश मिळेल, तेवढे काँग्रेसचे नुकसान आहे. काँग्रेसचे घर मजबूत नाही आणि राहुल गांधी मात्र ‘भारत जोडो’चा घोष करीत निघाले आहेत.