नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरातील रस्त्याच्या बाजूला बहुस्तरीय भूमिगत वाहिन्या कार्यान्वित केल्यास रस्त्याचे आयुर्मान वाढते. याचा अनुभव युरोपीय देश चांगल्या प्रकारे घेत आहेत. या प्रकारच्या भूमिगत वाहिन्या आधुनिक शहर म्हणून समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईत रस्त्याच्या कडेला टाकल्या जाव्यात. या प्रकारची मागणी सातत्याने होत होती; परंतु पालिका प्रशासन या मागणीला दाद देत नव्हते. शेवटी एका सामाजिक कार्यकर्त्यांनी खुद्द आयुक्तांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर बहुस्तरीय भूमिगत वाहिन्या टाकण्याचे आदेश आता पालिकेचे शहर अभियंता यांनी दिले आहेत.
युटीलटी डक्ट म्हणजे रस्त्याची कामे सुरू असताना त्याच्या शेजारी एक पाईप लाईन टाकणे हे आहे. ही पाईप लाईन टाकल्यावर खासगी, सरकारी नेट, केबल वाहिन्या टाकताना रस्ता खोदावा लागत नाही. तसेच महावितरणच्या देखील वाहिन्या टाकताना रस्त्यांचे. कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जर बहुस्तरीय भूमिगत वाहिन्या टाकल्या गेल्या नाही, तर रस्ता खोदावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची नासधूस होऊन नाहक आर्थिक खर्च करावा लागत आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. हा खर्च होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांनी बहुस्तरीय भूमिगत वाहिन्या टाकाव्यात म्हणून मागील तीन वर्ष सातत्याने मागणी करत होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेचे रस्ते उत्कृष्ट दर्जाचे असून ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची नव्याने काँक्रिटीकरणाची कामे केली आहेत. त्या ठिकाणी युटीलीटी डक्टची व्यवस्था केलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर रस्ता, एमआयडीसी क्षेत्रातील सर्व काँक्रिटीकरण केलेले रस्ते, पटनी रस्ता, बेलापूर से. १५ येथे काँक्रीट रस्त्यांच्या लगत व चौकांमध्ये युटीलीटी डक्ट व सर्व रस्त्यांना क्रॉस डक्ट केलेले आहेत. याच युटीलिटी डक्टमधून केबल्स व इतर युटीलीटी टाकल्या जातात.अशा आशयाचे निवेदन पालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी आदेशात म्हटले आहे.
भविष्यात प्रत्येक रस्त्याचे काम करताना रस्त्याच्या कडेला युटीलीटी डक्टची व्यवस्था करणे महापालिकेने धोरण अवलंबिले आहे. महानगरपालिका प्रत्यक्षात पूर्वीपासूनच रस्त्यांच्या बाजूने युटीलीटी डक्टची व्यवस्था करीत आहे. -संजय देसाई, शहर अभियंता