प्रा. प्रतिभा सराफ
गेल्या मार्चमध्ये माझ्या शाळेतल्या शिक्षिका सुषमा बर्वेबाईंचा फोन होता. ‘प्रतिभा भेटायला ये!’ यापूर्वी बाईंचा जेव्हा जेव्हा फोन आला तेव्हा मी दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचले; परंतु या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाईंकडे जाण्याची हिंमत करत नव्हते, कारण बाईंचे वय साधारण ८५ वर्षे! त्यानंतर वर्षभरात दहा वेळा तरी फोन आला. मी काही ना काही खोटी कारणे देत राहिले. काल परत बाईंचा फोन आला आणि मला राहवले नाही. मी आज बाईंना भेटायला गेले. तब्बल तीन तास गप्पा झाल्या. बाई मला सूर्यास्ताचे सौंदर्य दाखवत होत्या आणि बोलण्यातून मात्र माझ्या मनात असंख्य सूर्योदय पेरत होत्या.
निराशाग्रस्त आणि आत्महत्येकडे वाटचाल करणारी तरुण पिढी पाहिली की विचार करते, इतकी सकारात्मकता या वयात ही माणसं कुठून आणतात? खरंच कौतुकस्पद आहे. स्वतःच्या अंगावरची ओढणी काढून त्यासोबत बागेतला नारळ आणि बर्फी देऊन माझ्या लेखन कार्यासाठी माझा छोटासा सत्कारही केला.
बाईंना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. इकडच्या तिकडच्या खूप गप्पा झाल्या. मी बाईंना म्हटले, ‘निघते आता.’
तर म्हणाल्या
‘थांब की जरा. एक फूल देते ते घेऊन जा.’
मला वाटले अजून दोन मिनिटे जातील, ठीक आहे.
मी ‘हो’ म्हटले.
बाईंनी एक डबा आणला. त्यातून काही रंगीत कागद काढले, चिकटपट्टी काढली, तार काढली. मी पाहातच राहिले. मग त्यांनी समरसून लाल कागदाचा सुंदर गुलाब तयार केला. मग एक तार घेऊन त्याला हिरवा कागद गुंडाळला. एक हिरव्या रंगाचे सुंदर पान बनवले ते तारेला डकवले आणि मग ते फूल माझ्या हातात दिले. हे काम करताना त्या अखंडपणे बोलतही होत्या. मी काहीच बोलले नाही; परंतु बाईंना मी अजून थोडावेळ त्यांच्यासोबत हवे होते, हे मात्र माझ्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही.
वयाची ऐंशी ओलांडलेल्या बाई आपला सगळा वेळ असाच सकारात्मक कार्यात, आनंदाने घालवत असतील! सगळा खजाना घरी घेऊन येताना मी बाईंकडून खूप सारी ऊर्जा घेऊन आले. ही कागदी फुले आयुष्यभर मला खूप खूप सुगंध देणार आहेत!