Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाजभारतीय आरमाराची गाथा

भारतीय आरमाराची गाथा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ सप्टेंबर २०२२ रोजी संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या विक्रांत या आधुनिक विमानवाहू युद्धनौकेला भारतीय नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आले. ही क्रांतिकारी गोष्ट भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली जाईल.

या समारंभात पंतप्रधान मोदी यांनी नौदलाला नवीन बोधचिन्ह असलेले निशाण अर्पण केले. या निशाणामध्ये शिवछत्रपतींच्या मुद्रेच्या अष्टकोनी आकाराचा उपयोग करण्यात आला आहे. हे करून पंतप्रधानांनी परकीय इंग्रजांच्या गुलामीचे जोखड झुगारून शिवरायांच्या स्वदेशी चिन्हाचा वापर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवरायांपासून प्रेरणा घेऊन आपण भारताला सशक्त केले पाहिजे, असा विचार मांडला. ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. यानिमित्ताने भारताच्या वैभवशाली नौदलाच्या इतिहासाचा मागोवा घेणे इष्ट ठरेल.

पांडुरंग बलकवडे

भारताच्या प्राचीन नौकानयनाचा इतिहास

भारतीय जहाज बांधणी आणि नौकानयन परंपरेला फार मोठा प्राचीन इतिहासाचा वारसा आहे. ऋग्वेदामध्ये नाव अथवा जहाजाचा प्लाव असा उल्लेख आला आहे. पाच हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती (लोथल) आणि इजिप्तमधील पिरॅमिडमध्ये जहाजांची शिल्पे आपल्याला पाहावयास मिळतात. मौर्य राजवटीमध्ये सम्राट अशोकाने आपल्या मुलांना धर्मप्रसारासाठी समुद्रमार्गाने श्रीलंकेत पाठविल्याचा संदर्भ सापडतो. दोन हजार वर्षांपूर्वी दक्षिणेचा सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी त्रिसमुद्र तोय पोतवाहन म्हणजेच तीन समुद्राचे पाणी प्यालेला अथवा तीन समुद्रांवर वर्चस्व निर्माण करणारा अशी बिरुदावली स्वतःस लावतो. समकालीन अनेक भारतीय राजांच्या नाण्यांवर जहाजांची चित्रे कोरलेली होती. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात निर्माण केलेल्या सांची स्तुपाच्या पश्चिमेकडील तोरणावर नौका शिल्प कोरले आहे. दुसऱ्या शतकात निर्माण केलेल्या कान्हेरी लेण्यामध्ये एका बुडत असलेल्या जहाजाचे चित्र काढलेले आहे. अजंठ्यातील क्र. २ च्या लेणीमध्ये बुडणाऱ्या नौकेचे चित्र रंगविले आहे, तर आणखी एका लेणीमध्ये जहाजातून समुद्रमार्गे सिलोनला गेलेल्या विजयसिंहाचे चित्र रंगविले आहे. या चित्रात त्या जहाजामध्ये हत्ती असून त्या हत्तीवरील अंबारीत राजा बसलेला आहे. हे जहाज तीन डोलकाठींचे आहे. जगन्नाथपुरीच्या मंदिरावर जलविहाराचे एक चित्र कोरलेले आहे.

अनादिकाळापासून प्रगत मानवी संस्कृतीमुळे भारत ज्ञान आणि सांपत्तिकदृष्ट्या समृद्ध होता. त्यामुळेच तो सर्व जगाच्या आकर्षणाचा विषय राहिला होता. याच आकर्षणातून सिकंदरापासून ग्रीक, रोमन, शक, हूण, कुशाण, अफगाण, तुर्क, इराणी, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी परकियांची हिंदुस्थानावर आक्रमणे होत आली होती. समुद्रमार्गे होणारा भारताचा प्राचीन व्यापार जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी भारताला भेट दिलेल्या कर्टीअस, डिओडोरस आणि टॉलेमी या परकीय प्रवाशांनी समुद्रमार्गाने होत असलेल्या समृद्ध व्यापाराचे वर्णन केले आहे. त्यावरून भारतातून नीळ, मसाल्याचे पदार्थ, चंदन, हस्तिदंत, रेशमी आणि सुती कापड इ. वस्तूंची निर्यात युरोपमधील ग्रीक, रोमन तसेच मध्य आशियातील इजिप्त, मिसोपिटीनिया, तसेच चीन या संस्कृतींशी होत होता. तर भारतात रोमन खापराची भांडी, मदिरा, चिनी मातीची भांडी इ. वस्तू आयात होत होत्या.

समुद्रमार्गाने भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रसार

दहाव्या शतकात महाराज भोजाने लिहिलेल्या युक्ती कल्पतरू; या ग्रंथात जहाज बांधणीचे तंत्र सांगितले आहे. मध्ययुगामध्ये आशिया खंडाच्या भारताच्या पूर्वेकडील कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, ब्रह्मदेश इ. देशांशी दक्षिणेतील पांड्य, चौल इत्यादी राजवंशांचा व्यापारी व सांस्कृतिक संबंध निर्माण झाला होता. इशान वर्मन, जय वर्मन, यशोवर्मन, सूर्यवर्मन इत्यादी दक्षिणेतील राजांनी समुद्रमार्गांनी या देशावर मोहिमा काढून तिथे आपले राज्य स्थापन केले होते. त्यांनी या देशांमध्ये अंकुरवाटसारखी असंख्य मंदिरे निर्माण करून हिंदू संस्कृतीचा प्रसार केला होता. आजही इंडोनेशियामध्ये मोठ्या भक्तिभावाने रामायण आणि महाभारताची उपासना केली जाते.
भारतीय सागरी व्यापाराचा ऱ्हास

भारतीय नौकानयनाच्या एवढ्या समृद्ध परंपरेचा ऱ्हास का आणि केव्हा झाला याचा विचार करावा लागेल. इ. स. १३०० नंतर जागतिक सागरी व्यापारावर अरबांचे वर्चस्व निर्माण झाले. त्यांनी अरबी समुद्रामध्ये प्रचंड लुटालूट, कत्तली आणि चाचेगिरी सुरू केली. त्यांच्या विध्वंसक धोरणामुळे भारताचा सागरी मार्गाने होणारा व्यापार थांबला. याचा परिणाम भारतीय लोकांच्या मनात समुद्र प्रवास आणि जहाज बांधणी याविषयी उदासीनता निर्माण होऊन समुद्रबंदीसारखी अनिष्ठ प्रथा निर्माण झाली. एवढेच नव्हे तर भारतीय शासनकर्त्यांकडे असलेल्या आरमाराचा ऱ्हास झाला. आधुनिक जहाजबांधणीची कलाही लोप पावत गेली.
इ. स. १४५३ मध्ये युरोप आणि आशियाला जोडणाऱ्या कॉन्स्टॅटीनोपोल या रोमनांच्या ताब्यातील शहराला तुर्कांनी जिंकून घेतले व त्याचे नाव इस्तंबूल असे ठेवले. याचा परिणाम खुश्कीच्या मार्गाने भारताशी होणारा व्यापारही थांबला. अशा वेळेस युरोपियन सत्तांनी भारताशी जोडणाऱ्या दुसऱ्या मार्गाचा शोध घ्यावयास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी धाडसी खलाशांना प्रोत्साहित केले. त्यातूनच वास्कोदिगामा आणि कोलंबससारखे अनेक दर्यावर्दी हिंदुस्थानच्या शोधासाठी बाहेर पडले. अनपेक्षितरीत्या कोलंबसला अमेरिका सापडली, तर ११ मे १४९८ रोजी वास्को दि गामा हिंदुस्थानच्या कालिकत बंदरात येऊन पोहोचला.

वास्को दि गामाकडून भारताच्या नव्या सागरी मार्गांचा शोध आणि त्याचे परिणाम

वास्को दि गामाचा हा शोध हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी युरोपियन देशांमध्ये भारताशी व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीसारख्या अनेक कंपन्या स्थापन झाल्या. या सर्व कंपन्यांनी भारतातील स्थानिक सत्तांकडून व्यापारासाठी वखारी स्थापन करण्याच्या परवानग्या मिळविल्या. त्या वखारीच्या रक्षणासाठी सैन्य दले उभी केली व हळूहळू त्या परिसरात आपापली सत्ता स्थापन केली.

शिवपूर्वकाळात भारताच्या सागरतीराची परिस्थिती

१७व्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजेच शिवकाळाच्या सुरुवातीस भारताच्या संपूर्ण किनारपट्टीवरील जल वाहतूक आणि व्यापारावर युरोपियन सत्तांचे वर्चस्व होते. मुघलांसारख्या भारतातील बलाढ्य सत्तेलाही या युरोपियन सत्तांच्या वाट्याला जाण्याची हिंमत होत नव्हती.

मुघल बादशहाच्या स्वतःच्या जहाजांनाही समुद्रामध्ये प्रवास करण्यासाठी या युरोपियन सत्ताधीशांचा परवाना घेणे भाग पडत होते. भारतातील एकाही शासनकर्त्याकडे कार्यक्षम आरमार नव्हते. त्यामुळे या अनिर्बंध झालेल्या युरोपियन सत्तांना रोखणे त्यांना शक्य होत नव्हते. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच या सत्तांनी हिंदुस्थानात आपल्या ताब्यातील प्रदेशामध्ये स्थानिक जनतेवर अनन्वित अत्याचार, लुटालूट आणि धर्मांतराचा अन्याय सुरू केला होता.

शिवाजी महाराजांकडून आधुनिक सशक्त स्वकीय आरमाराची निर्मिती –

अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शक्तिशाली आरमाराची निर्मिती करून या अनिर्बंध झालेल्या युरोपियन सत्तांना रोखण्याचा प्रयत्न केला. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी जिंकून घेतली. त्याच वेळेस कल्याण बंदरात असलेली शत्रूची जहाजे ताब्यात घेऊन आपले आरमार स्थापन झाल्याची घोषणा केली. परंपरागत भारतीय जहाज बांधणीच्या तंत्रज्ञानाबरोबर युरोपियन लोकांचे प्रगत जहाज बांधणी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक युरोपियन जहाज अभियंत्यास मोठा पगार देऊन आपल्या नोकरीत घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कारागिरांना प्रशिक्षित करून इंडो-युरोपियन मिश्र जहाज बांधणीचे तंत्रज्ञान विकसित केले. गलबत, गुराबा, शिबाड, मचवा आणि प्रचंड मोठ्या आकाराच्या पाल प्रकारची शेकडो जहाजांची निर्मिती केली.

कोळी, आगरी, भंडारी इत्यादी कोकण किनारपट्टीवरील स्थानिक खलाशी लोकांची भरती करून एक सशक्त सागरी सैन्यदल उभे करून आधुनिक आणि शक्तिशाली आरमार निर्माण केले. सशक्त आरमाराबरोबरच सागरी सीमांचे रक्षण करणे आणि आरमाराच्या सुरक्षित तळासाठी शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा यांसारखे अनेक जलदुर्ग बांधले.

सशक्त आणि आधुनिक आरमार तसेच बुलंद जलदुर्ग यांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी जंजिरेकर सिद्दी आणि पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच यांच्यासारख्या आधुनिक युरोपियन सत्तांवर सागरी संघर्षामध्ये वर्चस्व गाजविले.

बसरूरमध्ये शिवाजी महाराजांकडून शक्तिशाली पोर्तुगीज आरमारावर विजय

कर्नाटकमधील बसरूरच्या शिवाप्पा नायकाच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्यावर पोर्तुगीज अॅडमिरल कॅप्टन मॅन्युअल द सिल्वेरा याने सॉव जसिंतो या आधुनिक युद्धनौकेबरोबर शेकडो लहान-मोठ्या जहाजांसह आक्रमण केले. त्यावेळेस शिवाप्पा नायकाच्या विधवा पत्नीच्या विनंतीवरून ८ फेब्रुवारी १६६५ रोजी शिवाजी महाराज आपल्या ८५ युद्धनौकांसह पोर्तुगिजांवर चालून गेले व त्यांचा पराभव केला. शक्तिशाली पोर्तुगिजांचा हा भारतीयांकडून झालेला पहिलाच मोठा पराभव होता.

खांदेरीच्या लढाईत आधुनिक इंग्रजांवर मात –

मुंबईकर इंग्रज आणि जंजिरेकर सिद्दी यांच्यावर मात करण्यासाठी शिवाजी महाराजांनी १६७९ मध्ये मुंबईजवळ आणि जंजिरेकर सिद्दीच्या उंदेरी किल्ल्यालगत खांदेरी बेटावर एक जलदुर्ग बांधण्याच्या कार्याला सुरुवात केली. आपला आरमारातील प्रमुख सरदार मायनाक भंडारी आणि दौलतखान यांच्यावर बांधकामाची आणि रक्षणाची जबाबदारी सोपविली. इंग्रजांनी खांदेरी किल्ल्याच्या बांधकामास रोखण्याचे अनेक प्रयत्न केले. प्रत्येक वेळेस मराठ्यांनी त्यांच्यावर मात केली. सप्टेंबर १६७९ मध्ये झालेल्या आरमारी युद्धात लेफ्टनंट फ्रान्सिस थॉर्प, कॅप्टन मिंचीन, ह्यूज आणि कॅप्टन रिचर्ड केंग्विन यांसारख्या अनुभवी इंग्रज सेनानी व त्यांच्या दिमतीला असलेली तत्कालीन जगातील आधुनिक युद्धनौका रिव्हेंज व तिच्याबरोबर असलेल्या इतर जहाजांवर आपण निर्माण केलेल्या संगमेश्वरी आणि इतर युद्धनौकांच्या सहाय्याने पूर्ण मात केली. याचा परिणाम या युद्धात सामील असलेल्या काही इंग्रज अधिकाऱ्यांनी मुंबईच्या गव्हर्नरकडे शिवाजी राजांनी विकसित केलेल्या संगमेश्वरीसारख्या युद्धनौकेच्या निर्मितीची गरज असल्याचे व्यक्त केले.

शिवाजी महाराजांच्या पश्चात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सशक्त आरमार निर्माण करून जंजिरेकर सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगिजांवर अनेक आरमारी युद्धात मात केली व प्रतिकूल परिस्थितीत कोकण किनारपट्टीचे शत्रूपासून रक्षण केले. स्वदेशी शक्तिशाली आणि आधुनिक आरमार उभे करणारे शिवाजी महाराज हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण भारतीयांनी सर्व क्षेत्रात आधुनिकता आणि स्वदेशीचा अवलंब करून उद्याचा गौरवशाली भारत घडविण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे, हीच या लेखामागील अपेक्षा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -