Thursday, September 18, 2025

जव्हारमधील ग्रामस्थांचा नदी पात्रातून जीवघेणा प्रवास

जव्हारमधील ग्रामस्थांचा नदी पात्रातून जीवघेणा प्रवास

जव्हार (वार्ताहर) : आकरे ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना मुलभूत सोयीसुविधांची वानवा असल्याने चक्क नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विषेश म्हणजे यामध्ये शाळकरी मुलांसह वयोवृद्धांनाही याच मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. प्रशासनाकडे तक्रार करुन देखील त्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत आकरे येथील आंब्याचापाडा व आजूबाजूच्या पाड्यातील विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांना आंब्याचापाडा ते तासुपाडा जाण्यासाठी नदीतून किंवा नदीवरील शेवळलेल्या बंधाऱ्यावरून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. चांभारशेत व तासूपाडा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची १ ली ते १२ वी पर्यत माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा असून या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच आकरे, आंब्याचापाडा व इतर गाव पाड्यातील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत.

त्यांना येजा करण्यासाठी जवळचा एकमेव मार्ग असून, पावसाळी पूरजण्यपरिस्थितीत आदिवासी बांधवांना व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदीपार करावी लागते. जर नदीला पूर आला असेल तर ६ किलोमीटरचा प्रवास करून विद्यार्थ्यांना चालत शाळा गाठावी लागते. याकडे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधिनी लक्ष घालून रस्ता किंवा पूल तयार करून द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment