Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजरक्तं जीव इति स्थिती

रक्तं जीव इति स्थिती

डॉ. लीना राजवाडे

वाचक हो, आपले शरीर आपण जवळून, सूक्ष्मदर्शक न वापरता कसे बनले आहे, हे समजावून घेत आहोत. शरीरातील महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त धातू. जीवन हेच ज्यावर अवलंबून असते, असा हा महत्त्वाचा शारीर भाव आहे. खरं तर मी वैद्यकीय शाखेच्या पहिल्या वर्षाला शवविच्छेदन करताना मला हे थोडे समजले; परंतु जास्त करून प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात केल्यावर, प्रत्यक्ष आणि शास्त्र म्हणून शिकलेल्या संहिता यांची सांगड घातल्यावर ते अधिक स्पष्ट झाले. सामान्य माणसालाही हे समजले पाहिजे हे प्रकर्षाने जाणवले. म्हणून आजचा हा लेख लिहिते आहे.

रक्त हे नेमके कुठे तयार होते. रक्त कोणत्या कारणांनी बिघडते. रक्ताचे पाच भौतिक घटक कोणते. शुद्ध रक्त कसे ओळखावे. याविषयी आजच्या लेखात आपण माहिती करून घेऊ. आज खरं तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे.

  • रक्तगट, रक्तपेशीचे प्रकार, अतिसूक्ष्म रक्त पेशी एवढ्या गोष्टी संशोधनातून समजत आहेत. या गोष्टी ज्या वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना जास्त महत्त्वाच्या आहेत. पण मी मागील दोन्ही लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या मूलभूत गोष्टी शास्त्र म्हणून माहिती पाहिजेत.
  • सर्वात महत्त्वाचे, सर्व शरीरात सतत फिरणारी एकमेव गोष्ट म्हणजे रक्त आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे रोग हे जास्त करून रक्तामुळे होऊ शकतात. प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र संहितेमध्येही रक्त धातूला स्वतंत्र विशेष महत्त्व सांगितले आहे.
  • तद् विशुद्धं ही रूधिरं बलवर्णसुखायुषा युनक्ति प्राणिनं प्राणः शोणितं ही अनुवर्तते (विधिशोणितीय अध्याय, चरकसंहिता) रक्त योग्य प्रकारे शुद्ध ठेवले, तर शरीरातील प्राण शक्ती ही त्या विशुद्ध रक्ताबरोबर राहते. आयुष्य सुखकर होऊ शकते. शरीराची ताकद, त्वचेचा वर्ण तजेला, रसरशीतपणा टिकून राहतो.
  • रक्ताच्या ठिकाणी मल स्वरूप द्रव्य साठून राहिली, तर संन्यास ज्याला आधुनिक भाषेत कोमा म्हणतात. ही गंभीर अवस्थाही येऊ शकते. माणसाचा जीव रक्ताशी किती जवळून संबंधित असतो, हे यावरून लक्षात येईल.
  • आता बघूयात हे रक्त कोणत्या कारणांनी घडू शकते. अति तीक्ष्ण, उष्ण मद्य पिण्याचे व्यसन असल्यास, वारंवार अति खारट, क्षार आबंट, तिखट पदार्थ खाणे. या दोन गोष्टींमुळे रक्तातील अम्लधर्म वाढतो. साठून राहतात. साहजिकच रक्त दुष्ट होते आणि त्यामुळे शरीरातील प्रणाली बिघडू लागतात. किडनीतूनही मल स्वरूप गोष्टी बाहेर पडायला त्रास होतो. तेव्हा वेळेवर जागे व्हायला हवे. शरीरावर अत्याचार करणे कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा. मी कसेही वागेन, काहीही खाईन, पिईन पण माझे शरीर नीटच राहिले पाहिजे, अशी मानसिकता असता कामा नये. आज समाजात चित्र भयंकर दिसते आहे, पैशाची सुबत्ता वाढते आहे, ताण कमी करण्याचा नव्हे एन्जॉयमेंटची कल्पना म्हणजे हॉटेलिंग, त्याची सवय प्रत्येक वीकेंडला. त्यातून मिळते ती नशा, अनारोग्य हे लक्षात येत नाही. लक्षात येते तेव्हा खूप उशीर झालेला दिसतो. या लेखाच्या निमित्ताने मला याविषयी अधिक लिहिता आले. न जाणो काही जण हे वाचून जागे होतील.
  • कुळीथ, उडीद, पावटा, तीळ तेल, दही-उष्ण, पचायला जड आहेत. तेव्हा त्यांचे सेवन मर्यादेत, कमी असावे. स्निग्ध, जड पदार्थ खाऊन दिवसा झोपणे, भुकेपेक्षा जास्त खाणे, मळमळत असताना ती उलटीची भावना दाबणे, वेळी अवेळी खाणे, अत्यधिक श्रमाने शक्ती कमी झाल्याने, संताप त्रागा केल्याने रक्त बिघडते. या गोष्टींनी एकूणच पचन क्रिया बिघडते. आहार रस चांगला तयार होत नाही, परिणामी त्यापासून तयार होणारे रक्तही बिघडते. toxic गोष्टी रक्तात साठू लागतात. ऋतुचा विचार केला तर शरद ऋतुत स्वाभाविक, सहज रक्त बिघडते. परंतु त्या वेळी ऋतुनुसार अनुकूल योग्य खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल केल्यास ते लवकर नियंत्रणातही आणता येते. याविषयी आपण पुढील लेखात अधिक जाणून घेऊ.
  • रक्त बिघडले की काय लक्षणे दिसतात, किंवा कोणत्या लक्षणांवरून रक्त बिघडते आहे हे समजू शकते. डोळे लाल होणे, तोंड येणे, तोंडाला घाण वास येणे. ही लक्षणे सहज दिसू शकतात. आपल्याला त्यावरून रक्त बिघडते आहे, हे समजले पाहिजे. डोळे लाल होतात म्हणून फक्त नि ते तात्पुरते बरे वाटेल. वारंवार ही तक्रार जाणवली, तर मी वर जी कारणे सांगितली आहेत, त्यातली आपण काय कारणे करतो आहोत का, हे व्यक्तीशः तपासले पाहिजे. किमानपक्षी ती कारणे कमी करून पाहिले पाहिजे. तरंच आपण लेख वाचला असे मी म्हणेन. नाहीतर रक्त बिघडले तर रक्त, पित्त शुद्ध करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानेच उपचार करावे लागतात.
  • आजची गुरुकिल्ली, शरीरातील रक्त, जाठराग्नी यांची नीट काळजी घेतली, खूप गरम किंवा गार असे न खाता पचायला हलके हितकर अन्न खाल्ले, तर हे सहज शक्य होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -