Friday, May 9, 2025

किलबिल

निमी आणि मिनी

निमी आणि मिनी

रमेश तांबे


एक होती निमी अन् दुसरी होती मिनी. दोघींची गोष्ट आली उडत उडत कानी. सात-आठ वर्षांच्या दोघी होत्या बहिणी, एक होती काळी तर दुसरी जरा सावळी. हिरव्या हिरव्या माळावरती, भल्या मोठ्या झाडाखाली, निमी आणि मिनीचं घर होतं भारी. आई-बाबा त्यांचे शेतात काम करायचे, त्यांच्या सोबत दोघींना काम होते खेळायचे!


निमी होती काळी, पण खूप बडबडी, दिवसभर दंगा करी मारामारी. तिला वाटे आपले घर किती किती छान, झावळ्यांचे छप्पर पुढे फुलांची कमान. घरापुढच्या माळरानात ती खेळायला जायची, फुलपाखरामागे धावधाव धावायची. झाडावर चढून आंबे खायची, म्हशीवर बसून फिरफिर फिरायची.


घरासमोरचा डोंगर तिच्याशी बोलायचा, तिच्या पुढे मोर रोज रोज नाचायचा. पावसाच्या धारात निमी मस्त भिजायची, आपली आपणच खो-खो हसायची. मग रानातली परी हळूच यायची. डोक्यावर निमीच्या मुकुट चढवायची. सातरंगी मुकुट आणि सातरंगी कपडे, काळी निमी आपली राजकन्याच वाटायची!


या उलट सगळं होतं आपल्या मिनीचं! मिनी होती सावळी... म्हणजे निमीपेक्षा गोरीच! पण मिनी खेळायची नाही, हुंदडायची नाही. दिवसभर आपली गप्प गप्प बसून, कितीतरी दिवस झाले होते तिला खो खो हसून!


तिला वाटायचं; आपण इतके सावळे, मातीसारखे आहोत किती तरी काळे. तिच्या मनाला मग दुःख होई, निमीच्या वागण्याचा तिला रागच येई. अंगणातल्या पक्ष्यांना ती हाकलून द्यायची, हरणे सशांना उगाच ओरडायची. ओढ्याचे पाणी तिला घाणघाण वाटे, डोंगरावर तिला फक्त दिसायचे काटे. आरशात एकटक बघत बसायची, मनातल्या मनात कुढत राहायची. मिनीकडे बघून रानपरीला खूप वाईट वाटायचं, रोज विचार करायची.... मिनीला कसं हसवायचं?


मग एके दिवशी रानपरी मीनीच्या स्वप्नात आली. ‘मिनीताई मिनीताई’ अशी गोड हाक मारली. झोपेतून मिनी डोळे चोळत उठली, काळ्या काळ्या रानपरीकडे बघतच बसली.


परी म्हणाली, “अगं ए वेडाबाई, अशी स्वतःवर रूसतेस काय, मजेने जगायचं विसरतेस काय. माझ्याकडे बघ जरा; मी किती काळी, पण जग मला किती... वाटतंय भारी! ‘कोकीळ काळा, माती काळी, ढगसुद्धा काळा आणि जो आपला देव आहे तोसुद्धा काळा!”


“चल उठ मिनी, आता हो शहाणी. रंगावर माणसाच्या काहीच नसतं, आनंदी मन हेच खरं असतं. बघ त्या झाडावरच्या पिकलेल्या फळा, काळ्या काळ्या मैनेचा आहे त्यावर डोळा!”


तेवढ्यात काळा कोकीळ कुहूकुहू करू लागला अन् मिनीच्या चेहऱ्यावर हसू घेऊन आला! आता निमी आणि मिनी दोघीही खेळतात. खेळतात, भांडतात... पोट धरून “खो खो” हसतात!

Comments
Add Comment