मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षाकाठी राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्या तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाणार आहे.
अतिवृष्टीग्रस्तांना ३ हजार ५०१ कोटी सुपूर्द
अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शिंदे सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ३ हजार ५०१ कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द केले आहेत. जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर ३६ हजारांची मदत सरकारकडून करण्यात आली आहे. तीन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत केली जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून नागरिकांना हा आर्थिक दिलासा देण्यात येणार आहे.