Saturday, July 20, 2024

म्लान

डॉ. विजया वाड

वर्षं झालं मिलिंद उमलत नव्हता. खायचं म्हणून खात होता. प्यायचं म्हणून पीत होता. चहा, कॉफी, गरम पाणी द्याल ते. कसली तक्रार नाही. कुरकुर नाही. हे कसं घडलं? मिलिंदची आई त्याच्या शाळेत गेल्या.
“चिंता करू नका, मिलिंदचे नाव पटलावर आहे.” – पाळंदेबाई.
“होय. मोठ्या सरकारी इस्पितळात त्यावर उपचार चालूयत.” “पाळंदेबाई, अजून किती दिवस लागतील, सांगता येत नाही.”
“लागू देत तुमची इकडली आघाडी मी सांभाळेन. हेडबाईंना सायन इस्पितळाचे सर्टिफिकेट पाठवून दिले आहे. वर्ष जाईलसे वाटत नव्हते. पण त्याचे सर्वोच्च गुण ऑटोमॅटिक प्रमोशनला उपयोगी पडतील. एखादी तोंडदेखली परीक्षा घेतील हवी तर.”
“किती धीर आला हो तुमच्या बोलण्याने पाळंदेबाई!”
“मिलिंदची आई, असं काय बरं?”
“खरंच सांगते, धावत्याचा जमाना आहे.”
“थांबला तो संपला हेच खरं ना?”
“मिलिंदची आई, थांबला तो वाकला. कमर पसरुनि उत्तिष्ठ झाला. उठला नि चालू, पळू लागला.” मिलिंदची आई पाळंदेबाईंच्या धीराच्या शब्दांनी परत उभ्या राहिल्या.
“दुसरा कुणी असता, तर शाळेतून काढले असते.” मिलिंदची आई म्हणाली.
“टाटा मेमोरिअलचे डीन शाळेत आले होते मिलिंदची आई.”
“काय सांगता काय बाई तुम्ही?”
मिलिंदची आई चकित झाली. एरवी डीन साहेब एकांडे, कार्यमग्न, खत्रुड म्हणून ज्ञात होते.
“डीन आले आणि मेडिकल सर्टिफिकेट स्वत: हेडसाहेबांच्या हाती देऊन गेले. शाळा अॅक्सेप्ट करेलच. टाटाचे डीन! म्हणते मी केवढं आश्चर्य आहे ना?”
“आश्चर्य तर आहेच. मी स्वत: डीन साहेबांची भेट घेईन.”
“मिलिंदची आई, माझं नाव सांगू नका हो!”
“घाबरू नका मुळीच. अहो मला कसं समजलं? जर विचारलं, तर असा प्रश्न निर्माण होतो ना बाई?”
“हो. तेही खरंच.”
“पण विचारलं तर सरळ सांगेन. गैरहजेरी किती दिवस? म्हणून विचारायला आले.”
“मग; तुमचे ते कर्तव्यच आहे. त्याची वर्गशिक्षिका म्हणून.”
आईचे समाधान झाले. घरी गेली. काम आटपून!
डीन साहेबांकडे भीत भीत गेली.
“साहेब, तुम्ही स्वत: शाळेत गेलात?”
“होय.”
“सामान्य आहोत हो आम्ही.”
“पण तुमचा मुलगा असामान्य आहे. अढीतला हापूस पक्का आंबा आहे. अगदी आपल्या सुहासाने अढी दरवळून टाकणारा.”
“सुख वाटते हो डॉक्टर साहेब असे सारे ऐकताना!”
मिलिंदची आई टपटप आसवे गाळू लागली. तसे टपटप डॉक्टर साहेबही रडू लागले.
“मिलिंदची आई, मीही डॉक्टर आहे. एक पिता पण आहे.”
“मला ठाऊक आहे डॉक्टरसाहेब.”
“पण दुर्दैवाने माझा अनय या जगात नाही.”
“मला तेही ठाऊक आहे.” ती जड स्वरात म्हणाली.
“माणूस यशाच्या धुंदीत… जगतो, वाढतो. मस्तवाल होतो. मीही तसाच जगलो, वाढलो आणि मस्तवाल झालो. टाटाचा हेड ऑफ दि डिपार्टमेंट झालो. डीन पदाच्या पायऱ्यांआधीची स्टेप. कल्पना करा. माझा गर्व इतका वाढला की अनय भेटीसाठी तळमळत असताना मी मात्र शस्त्रक्रिया करीत राहिलो. अनय गेला!”
काय बोलायचं असेल त्याला? शेवटी काय सांगायचं असेल? कितीदा मनात येतं आणि मी अस्वस्थ होतो. जाताना त्याचा चेहरा अगदी म्लान होता. अगदी म्लान! हेच ते न सांगितलेलं रहस्य असेल का?
शरीर संपलं की, आत्मा उडून जातो म्हणतात. ते खरंच आहे. आत्मा शरीर जपतो. पण उठून गेल्यावर? इलाज चालत नाही. आत्मा अशरीर होतो. दुसरे जीवन स्वीकारतो का? बरे जीवन मिळते का? आत्म्याला चॉईस असतो का? काही कळत नाही. मृत्यूनंतरचे जग! गूढ आहे. अनुत्तरित आहे.
“डॉक्टर, मिलिंद काय म्हणतोय? बघा बरं! मिलिंद, मिलिंद काय सांगायचं आहे?”
“माझी बॅटss…” जीवच संपला. काय बॅट? कसली बॅट त्याला द्यायची होती का? काय सांगायचं होतं. डॉक्टर
कानात आवाज साठवत राहिले. त्यांच्या अनयचे हेच शब्द होते. माझी बॅट…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -