Friday, May 9, 2025

तात्पर्य

महाराष्ट्र गीत गाथा

महाराष्ट्र गीत गाथा

डॉ. वीणा सानेकर


आपल्या सर्वांच्याच जीवनात मायभू विषयीच्या गीतांना, देशभक्तिपर गीतांना आदराचे स्थान आहे. पोवाड्यांसारख्या रचनांनी तर अक्षरश: माणसांमध्ये प्राण फुंकले. पोवाड्यांनी कधी युद्धकथा सांगितल्या, तर कधी इतिहास घडवणाऱ्या नायक-नायिकांची तेजस्वी चरित्रे सांगितली. पानिपत रणसंग्राम, भारत - पाक युद्ध, भारत-चीन युद्ध, शिवाजी राजांनी जिंकलेल्या लढाया अशा अनेक युद्धांच्या कथा वीरगीते, पोवाडे आणि कवितांतून अजरामर झाली आहेत. कुसुमाग्रजांनी केलेला क्रांतीचा जयजयकार किंवा त्यांचीच बाजीप्रभूची वीरकथा सांगणारी ‘सरणार कधी रण प्रभू तरी’सारखी रचना, स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘जयोस्तुते’ ‘सागरा प्राण तळमळला’ यासारखी ओजस्वी गीते किंवा ‘सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे, ‘यासारखे समरगीत अशी गीते तनामनात रणशिंग फुंकतात.


दि. मा. प्रभूदेसाई यांनी संकलित केलेली ‘महाराष्ट्र गीत गाथा’ चाळताना या गाथेत मराठीचा महिमा साकार करणाऱ्या विविध रचना दिसल्या. या गाथेत एकूण पाच विभाग आहेत.


विभाग
१ : महाराष्ट्र गीते, विभाग
२ : सह्याद्री, विभाग
३ : शिवरायाची गौरवगाथा विभाग
४ : भगवा झेंडा, जरिपटका, विभाग
५ : मराठी भाषा.


या प्रत्येक विभागातील गीतांचे व कवितांचे स्वतंत्र महत्त्व आहे. कोणत्या कारणे झाले हे निर्माण देशाचे कारण, देश जाणे, अशी भावना दि. मा. प्रभुदेसाई यांनी या गाथेच्या प्रस्तावनेच्या शेवटी व्यक्त केली आहे. या पुस्तकातील पाचव्या भागाचा आपण या लेखात आढावा घेणार आहोत.


या भागात श्रीधर, योगेश्वर अभ्यंकर, शाहीर अमरशेख, सुहासिनी इर्लेकर, कल्याण इनामदार, गोविंद काटकर, इंदिरा कुलकर्णी, सूर्यकांत खांडेकर, सोपानदेव चौधरी, माधव ज्युलियन, मधुकर जोशी, ना. गो. नांदापूरकर, पी. सावळाराम, बा. भ. बोरकर, सुरेश भट, मुक्तेश्वर अशा नामवंत कवींच्या रचना आहेत.


माझी माय आहे मरहट्टी
ती माझी मी तिच्याचसाठी
हक्कावर कोणाच्या कोणी
जगू नये रे बांध घालुनी
हेच शिकवित माय मराठी
म्हणुनिच ती मम ओठी पोटी


शाहीर अमरशेख यांनी माणसांचे हक्क कुणी हिरावून घेऊ नये, हा संदेश माझी मराठी देत राहते, असे म्हटले आहे.
सुहासिनी इर्लेकर माझा मराठाचि बोल दिव्य आकाशातून प्राप्त झाला असून तिला धक्का लावणारा तिच्या तेजाने जळून भस्मसात होईल, असे म्हटले आहे.


जनाई, मुक्ता, तुकोबा, एकनाथ यांनी भारूड, ओवी, अभंग अशा विविध रूपबंधांमधून रचना केल्या. कल्याण इनामदार यांच्या कवितेत मराठी मातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य दिसते.


मराठी मातीला हे अक्षरांचे वरदान लाभलेले आहे असे ते म्हणतात. अण्णा भाऊ साठे यांनी त्यांची एक रचना शाहिरांना अर्पण केली आहे.


मायभू महाराष्ट्राला त्यांनी गोजिरी असे म्हटले आहे, तर मराठीला ‘रेशमासम साजिरी’ असे म्हटले आहे. मराठीत रचना करून शाहिरांनी आपल्या कवनांना सजवावे आणि दीनदुबळ्यांना उठवावे असे त्यांनी म्हटले.


सजवुनीया कवनास उठवा
दीन दुर्बल मानवा
सुखशांतीचा पोवाडा गांजल्यांना ऐकवा.


शाहीर साबळे यांनी गायलेल्या एका लोकगीतात मराठीला सह्यगिरीवर सांडलेल्या कलशातील अमृतधारा असे म्हटले आहे. हिमालयाचे रक्षण हीच मराठी भाषा करेल, असा दृढविश्वास या गीतातून प्रकट झाला आहे. कवी विहंग यांच्या एका कवितेतून संतांसोबतच लोककवी आणि लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी केशवसुत अशा महनीय व्यक्तिमत्त्वांचे संदर्भ येतात.
जेव्हा बाळ गंगाधर मायबोलीत गरजतात तेव्हा काय घडते हे वर्णिताना कवी विहंग म्हणतात,


थरकाप इंग्रजांचा सुस्ती
उडे निद्रिस्ताची
अशी होती बलवंत
डरकाळी केसरीची


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची सजा भोगतानाही स्वातंत्र्यदेवतेला मायमराठीतून वंदन केले. विहंग पुढे म्हणतात,


काव्य निर्मी विनायक,
झेप गरुडाची शोभे
पत्थरांच्या भिंतीवर
अक्षरांना मोक्ष लाभे….


मराठीचा गौरव करणारी अविस्मरणीय गीते महाराष्ट्र गीत गाथेत सापडतात. ज्ञानदेवांची शब्दकळा मात्र विरळाच ! आजही प्रभुदेसाईंची महाराष्ट्र गीत गाथा मराठीचा सार्थ अभिमान जागवते. ती एकदा तरी आपण उघडून पाहायला हवी म्हणून तरहा लेखप्रपंच!

Comments
Add Comment