कोंडमारा

  115

प्रियानी पाटील


तिची मुलगी सहा महिन्यांची झाल्यानंतर ती माहेरी आलेली. माहेरी येतानाचा तिचा आनंद गगनी मावेनासा झालेला. आता चांगली वर्षभर राहणार असं ठासून सासूला सांगूनच ती निघालेली. सासूनेही आनंदाने मान डोलावली.
माहेरी येताच मुलीला तिने आपल्या आईच्या स्वाधीन केली. म्हणाली, कर आता काय कौतुक करायचं ते नातीचं!
आजीही खूश झाली म्हणाली, ‘करणारच आहे. नात कुणाची आहे.’
आणि तिची आई रमली नातीमध्ये. नात इवलीशी, गोंडस लाडुली. गोरीपान इवल्याश्या डोळ्यांनी जग न्याहाळताना टुकूटुकू सारं पाहत राहायची. आजी लाडुकपणे बोलायची तिच्याशी. तिचं सारं करायची. आता आजी आणि फक्त नात.
बरं जमलंय आजी आणि नातीचं म्हणून ती कौतुकाने या दोघींना न्याहाळू लागलेली. ‘आई, आता मी वर्षभर राहणार बघ इथे. कसली हौस मौज नाही सासरी.’ ती आईला म्हणाली तेव्हा आईचे डोळे विस्फारलेले.
‘सासूनेच तुझं सारं केलं. सहा महिने सासरीच तर होतीस बाळाला घेऊन. खरं तर मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरी करायचं असतं. पण तुझ्या हट्टापायी ते सासूने केलं. उपकार मान त्यांचे.’
‘ते मी पुढंचं वर्षभर माहेरी राहता यावं म्हणून केलं.’
‘तुझी सासू मुलगी झाली म्हणून पण किती खूश झाली ना, नाहीतर काही नाराज होतात’ तिची आई म्हणाली.
‘जाऊ दे ना, आता तो विषय... मी जरा जाऊन येते. तोवर तू बघ हिला.’
‘आता कुठे निघालीस?’ आईचं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं.
‘आणि आता हे काय कपडे घातलेस तू? लग्न झालंय, एक मुलगी आहे?’ तिचा तो अवतार बघून आई नाराज झाली.
‘अगं, सासरी मला कुठे असे कपडे घालायला मिळतात? माझा तर कोंडमारा होतो गं सासरी’ म्हणून तिने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले नि ती निघून गेली.
आतासं माहेरी आल्यापासून तिचं हे रोजचंच चाललेलं. आईच्या जीवावर मुलीला टाकून रोज कुठे ना कुठे भटकून यायचं. तंग कपडे घालून फिरायचं. वर्षभर आता हे असंच चालणार हे आईनेही जाणलं. पण मुलीला जा सासरी असं पण म्हणू शकत नव्हती आई. लहान मुलीला दिवसभर सांभाळताना, घरातलं सारं काम करताना आईचाही जीव मेटाकुटीला येऊ लागलेला. आपली मुलगी आपल्या संस्काराच्या विरुद्ध वागतेय. माहेरी आली म्हणून सवलतीचा फायदा घेतेय असं तिच्या मनाला नकळत वाटून गेलं. मुलीने माहेरी आल्यावर आराम करावा. जरूर करावा. पण सहा महिन्यांच्या मुलीला आपल्या जीवावर टाकून मुलीचं असं मित्र-मैत्रिणींसोबत भटकणं किती योग्य आहे? आईने मुलीला या वयात रित शिकवावी तशी मुलगी आता लहान नाही. एका मुलीची आई झालीय ती. कसं सांगावं मुलीला, कसं समजवावं? आईच्या मनाचा कोंडमारा झाला. ती निमूटपणे सारं सहन करत राहिली. रोज मुलीचं असं बेभान वागणं निमूटपणे पाहत राहिली. आईच्या मनाचा होणारा कोंडमारा मुलीला दिसूनही मुलगी त्याकडे दुर्लक्ष करत राहिली. तिचं वागणं आईला खटकरणारंच... पण काही बोलून उपयोग नाही, आता मुलगी सासरी जाईस्तोवर हे असंच चालणार हे तिने जाणलं.
शेवटी आईने न राहवून तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मुलगी लहान आहे, तिला आईचा लळा कसा लागणार? घरात पाय ठेव जरा, सारखी माहेरी आल्यापासून बाहेर फिरणं चालू आहे. स्वत:ची काळजी घे, आराम कर. असं आईने सांगूनही तिने दुर्लक्ष केलं.
‘आई आजकालच्या मुलींनी जरा मोकळं राहिलं पाहिजे. तुझ्या जमान्यात ठीक होतं सारं. स्वत:चा कोंडमारा करून जगणं, पण आता हे शक्य नाही.’ तिचं सांगणं.
‘अगं पण तुझ्या या अशा मोकळ्या वागण्यानं माझा किती कोंडमारा होतोय, हे तू लक्षात घेतलंस का? मुलीला तू दिवसभर अशी टाकून जातेस, घरातली कामं, तुझ्या आवडीनुसार पदार्थ बनवणं, हे सारं मी कशी करते, माझं मलाच ठाऊक. किमान तू तुझ्या मुलीपाशी तरी थांब, मग मी सारं करेन.’ आईच्या बोलण्याचा तिला राग
आला आता.
‘कुठची आई आपल्या माहेरी आलेल्या मुलीला असं बोलते का गं?’
तिचा सवाल.
‘संस्कार, रित सोडून वागलं की बोलावंच लागतं’ आईचं सांगणं.
‘माझी सासू नाही बोलली मला आजवर आणि तू आई असूनही बोलतेस मला’ ती रडवेली झाली.
‘मग सासूकडे जाऊन राहा. मग मुलीकडे तरी लक्ष राहील तुझं. तुम्हा मुलींना माहेरी आलं की, मोकळीक मिळाल्यासारखी वाटते. सासरी घालायला मिळत नाहीत ते कपडे मग माहेरी येऊन घालायचे आणि गाव भटकायचा. स्वत:च्या सहा महिन्यांच्या मुलीची काळजी घ्यायची सोडून मित्र-मैत्रिणी महत्त्वाचे वाटतात का?’ आईच्या रागाचा पारा चढलाच.
तिने मग भरभर जिन्स, टी-शर्ट चेंज करून साडी नेसली. मुलीला आईकडून हिसकावून घेतली तिला भरभर नवीन कपडे घातले आणि सासरी जायला निघाली.
तसा काही वेळाने छोट्या मुलीने टाहो फोडला. ती रडायची थांबेना, कळवळून तिचं रडणं पाहून आजीही व्याकूळ झाली, म्हणाली, नको जाऊस तू, तिला असं नको नेऊस रागाने. मी काय ते सांभाळते तिला, तू वर्षभर काय, दोन वर्षं राहा, मी सांगते तुझ्या सासू, नवऱ्याला. पण अशी तिला रडत नको नेऊस. आईचे असे भरलेले डोळे पाहून तिने बॅग खाली ठेवली. मुलीला आईच्या हातात सोपवली. आईच्या चेहऱ्यावर हसू उमललं, मात्र बाळ रडतच राहिलेलं. तिचं हे कळवळून रडणं बघून वाटलं डॉक्टरकडेच न्यावं. तशी मुलगी म्हणाली, आई तू घेऊन जा हिला डॉक्टरकडे, आज आमचं मैत्रिणींचं भेटायचं ठरलंय, छोटीशी पार्टी गं! म्हणून मुलगी उशीर होतोय म्हणून बाळाला आईकडे सोपवून निघूनही गेली.
आई मात्र बाळ का रडतंय या विचारात गुंगली. बाळाला गरम होत असावं म्हणून तिने बाळाचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला, तर एवढे तंग कपडे बाळाला घातलेले की ते तिला काढताही येईनात. एवढे घट्ट आणि फॅशनचे कपडे बाळाला खरंच टोचत असावेत, तिने ते कसेबसे काढले, पाहिलं तर बाळाचं अंग लालेलाल झालेलं. अंगावर वळ उमटलेले.
आपली फॅशन आपणापर्यंत आहे तोवर ठीक, बाळालाही भरीस पाडायला गेलं तर बाळाला ते सहन होणार आहे का? तिने बाळाला गार वारा घातला, तेव्हा बाळ शांत झालं. बाळाचा इवलासा जीव त्या कपड्यांनी कोंडलेला. ते बाळ कुणाला आणि कसं सांगणार या गोष्टी? अशांनी इवल्याशा जीवाचाही कोंडमारा होत असणार.
आईने सारं जाणलं. तिचे डोळे काहीसे पाणावले... मुलीला बोलावं तरी वाईट, सासरी पाठवावं तरी वाईट, होईल तसं करावं आपण सारं काम, होईल तसं सांभाळावं बाळाला असं म्हणून ती इवल्याश्या बाळाशी गोड हसली आणि मनातल्या गोष्टी मनात साठवून पुन्हा कामाला लागली.

Comments
Add Comment

डायरेक्टर्स ‘अ‍ॅक्टर’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  गोंडस, रुबाबदार असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिकेत विश्वासराव. ‘बेटर - हाफची लव

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मागील लेखात घाशीराम कोतवालबाबतचा खराखुरा इतिहास पाहिला. इतिहास हा नाटक, कथा व

आईपणाचा सोहळा

आसावरी जोशी : मनभावन ती आरडओरडा करते. आक्रस्ताळेपणाने थयथयाट करते. तिचे ऐकले नाही की...! आई कशी असते? प्रेमळ, सोशिक,

तिसऱ्या घंटेच्या आधी मेकअप उतरवताना...

राजरंग : राज चिंचणकर रंगभूमीवर नाटकाचा प्रयोग सुरू करण्यापूर्वी संबंधित नाटकमंडळींची खूप लगबग सुरू असते.

नात्यांच्या पारंपरिक चौकटींनी साकारलेला चित्रपट ‘बिन लग्नाची गोष्ट’

नात्यांच्या पारंपरिक चौकटींनी साकारलेला आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट' या आगामी मराठी

रंगमंचीय नाट्यकलेची कृष्णकळा...

राजरंग : राज चिंचणकर श्री  कृष्ण आणि त्याचे अवतारकार्य हा कायमच औत्सुक्याचा व अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे.