कल्याण (वार्ताहर) : ग्रामीण भागात कौशल्य विकासावर भर द्या, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र चंद्रकांत पाटील यांनी केले. जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनकार महाराजांच्या जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
सर्व कीर्तनकार मंडळी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत पाटील, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, माजी आमदार नरेंद्र पवार, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांची विशेष उपस्थिती होती.
मठाधिपती स्वामी समर्थ मठ नवनित्यानंद महाराज ऊर्फ मोडक महाराज, तसेच एकूण ८० प्रसिद्ध कीर्तनकारांची या भव्य सोहळ्यात उपस्थिती होती. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व कर्मचारी देखील उपस्थित होते. सर्व कीर्तनकार व राजकीय पदाधिकारी व पत्रकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आलेल्या मान्यवरांचे लेझीम पथकाने व फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी प्रास्ताविक केले. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत झुंजारराव यांनी केले.