नागपूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन लाभदायी कृषी करावयाची असल्यास गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले.
अॅग्रो व्हिजन फाऊंडेशन आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत कृषी आणि प्रक्रीयायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण-एपिडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सेंटर पॉइंट हॉटेल येथे ‘विदर्भातील फळे व भाजीपाला तसेच कृषी उत्पादनात निर्यातीची संधी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे उद्घाटन करताना नितीन गडकरी बोलत होते. याप्रसंगी एपिडाचे संचालक डॉ. तरुण बजाज, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, अॅग्रो व्हिजनचे सल्लागार डॉ. सी. डी. मायी, अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बोरटकर, एपिडाचे विभागीय प्रबंधक नागपाल लोहकरे, प्रगतिशील शेतकरी आनंदराव राऊत, रमेश मानकर व प्रशांत कुकडे उपस्थित होते.
कृषी क्षेत्रात नव्याने येणारे तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरातून शेतकऱ्यांनी रचलेल्या यशोगाथा तयार करुन त्या इतर शेतकऱ्यांपर्यंत जाणे आवश्यक आहे. निर्यातीसाठी आपले उत्पादन आवश्यक तेवढे सक्षम नाही, याचा विचार करुन त्यात तंत्रज्ञान वापरुन निर्यातक्षम करावे लागेल, त्यासाठी पैसा अधिक लागणार आहे, यासाठी शेतक-यांनी संघटीत होऊन कृषी उत्पादक कंपन्या उभाराव्या व त्यामाध्यमातून एकत्रितपणे हे सर्व करणे शक्य होईल, असे गडकरी यावेळी म्हणाले.