Tuesday, July 23, 2024
Homeमनोरंजन‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार निरोप; चाहते हिरमुसले...

‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार निरोप; चाहते हिरमुसले…

दीपक परब

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. या मालिकेच्या कथानकाने आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असून अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. मात्र या मालिकेमध्ये परीची भूमिका साकारणाऱ्या गोंडस मायरा वायकुळ हिने तर सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवले. मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे शूटिंग नुकतेच झाले. इतके दिवस इतर कलाकारांबरोबर परीनेही प्रेक्षकांची मने जिंकली असून गोड परी सगळ्यांनाच आपली वाटत होती. तिनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

परीच्या डोळ्यात पाणी…

मायरा वायकुळ ही बाल कलाकार मालिकेत येण्याआधीपासून सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे आई-वडील तिचे इन्स्टा अकाऊंट चालवतात. याआधीही तिच्या रील्सना खूप पसंती मिळत होतीच. आताही मालिका संपणार म्हणून मायराने भावना इन्स्टावर शेअर केल्या आहेत. ‘परी’ म्हणून पहिला सीन शूट केलेला दिवस अजूनही काल घडल्यासारखाच वाटतोय आणि पाहता पाहता आज मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मी खूप भावुक झालेय या क्षणाला. पण म्हणता म्हणता एक वर्ष कसे सरले ते कळलेच नाही; याचे कारण म्हणजे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी आणि मालिकेतील सर्व कलाकारांनी व संपूर्ण टीमने ‘परी’ला आणि अर्थातच मला म्हणजेच मायराला दिलेले अफाट प्रेम!’

येतेय ‘दार उघड बये’…

झी मराठीवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे नाव ‘दार उघड बये’ असे आहे. दार उघड बये या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रोमोमध्ये अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. तसेच या मालिकेचे कथानकही हटके असणार आहे, असा अंदाज प्रोमो पाहून लावला जाऊ शकतो. ही मालिका १९ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

भूलभुलैया २ लाही ‘ब्रह्मास्त्र’ने ‘टाकले मागे

सुमारे ११ वर्षांपूर्वी बीफबाबत रणबीर कपूर याने केलेल्या वक्तव्याचा फटका सिनेमाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. बजरंग दलाचा रोषामुळे महाकालचे दर्शन न घेताच आलिया-रणबीर परतले.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ शुक्रवारी ९ सप्टेंबरला रिलीज झाला. सोशल मीडियावर ‘सिनेमा बॉयकॉट करा’ असा प्रचार सुरू आहे. ‘बॉयकॉट’चे नारे सुरू असताना ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाला ओपनिंग घसघशीत मिळाली आहे. उज्जैन महाकाल मंदिरात रणबीर-आलियाला प्रवेश नाकारण्यात आला. असे सगळे असताना अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने ‘भूलभुलैया २’ या सिनेमाला मागे टाकले आहे. पहिल्याच दिवसाची मंगळवार रात्रीपर्यंत १.५० लाख तिकिटे विकली गेली. पुढे चार दिवसांत हे आकडे आणखी वाढले आहेत.

येतोय ‘चंद्रमुखी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेल्या ‘चंद्रमुखी’ सिनेमाचा २५ सप्टेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. ‘चंद्रमुखी’ने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील ‘चंद्रा’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.

‘प्रवाह पिक्चर’ या वाहिनीवर प्रेक्षकांना ‘चंद्रमुखी’ सिनेमा पाहायला मिळणार आहे. ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या ‘चंद्रा’ची प्रेमकहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. अमृता खानविलकरने या सिनेमात चंद्राची भूमिका साकारली, तर खा. दौलतराव देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे आहे. तर ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ सारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या प्रसाद ओक याने ‘चंद्रमुखी’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -