पैठण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार व सभा होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी मंत्री संदिपान भुमरे यांनी सुरू केली आहे.
चिकलठाणा विमानतळावरून बीड बायपास मार्गे नव्या सोलापूर-धुळे महामार्गावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा पैठणकडे रवाना होणार आहे. परंतु या रोडवर दुभाजक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा औरंगाबाद दौरा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. ज्या पैठण तालुक्यात एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे, त्या पैठणमध्ये शिंदे गटाकडून दौऱ्याच्या निमित्ताने नियोजन बैठका घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण असलेल्या सर्वच प्रमुख गावात शिंदे गटाचे महत्वाचे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत.