कळवण (प्रतिनिधी) : आद्यस्वयंभू सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचे संवर्धनाचे कामकाज सुरू होते. संवर्धनाचे काम सुरू असताना सप्तशृंगी देवीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली. तेजोमय, प्रफुल्लित विलोभनीय अशा स्वयंभू मूळमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन हा सोहळा उत्साहात पार पडला.
आदिमाया सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धनाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर सप्तश्रृंगी गडावर चैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळाले. आदिमायेच्या आभूषणांचे ट्रस्ट कार्यालयात पूजन होऊन अलंकारांची आदिमायेच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आभूषणांच्या दर्शनासाठी भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. भगवती मंदिरात रंगबेरंगी आकर्षक फुलांच्या माळांची केलेली आरास व त्यात आदिमायेस महावस्त्र परिधान करुन सोन्याचे मोठे मंगळसूत्र, कमरपट्टा, नथ, तोडे, कर्णफुले, चांदीचा मुकुट, अलंकार घालून साजशृंगार करण्यात आला होता.
प्राचीन मूळ मूर्तीतील आदिमायेचे हर्षीत, प्रफुल्लित असलेले विलोभनीय रूप पाहायला मिळाले. दि. ६ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत श्री भगवतीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पुरोहित वर्गाच्या मंत्रोच्चाराने धार्मिक वातावरणात पार पडला. विविध धार्मिक पिठातील विद्वान, धर्मशास्त्र पारांगत गणेश्वरशास्त्री द्राविड (धर्म मार्तंड) (काशी व वाराणसी), राजराजेश्वर द्राविड, धारवाड (कर्नाटक) यांच्या मार्गदर्शनानुसार शांताराम भानुसे- नाशिक, भालचंद्र शौचे, बाळकृष्ण दीक्षित, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील पुरोहित संघाच्या वतीने धार्मिक पूजाविधी दरम्यान श्री भगवती मंदिरात सहस्त्र कलश स्नान, संप्रोक्षण विधी, उदक शांती, कलाकर्षण इत्यादी धार्मिक पूजा विधी पूर्ण करण्यात आली.
भगवती मूर्तीचे सर्व अवयव साक्षात सप्तशृंगी कलश रूपाने कलशात स्थापित असल्याने या कलशाचे गेल्या ४५ दिवसांपासून विधीयुक्त पद्धतीने यथा सांग भगवतीचे सप्तशती पाठ पुंजीका स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष या संपूर्ण विधी करून गेल्या तीन दिवसांपासून आई भगवतीची प्राण प्रतिष्ठा सोहळा सुरू असून कलशाची सप्तशृंग गडावर भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
कलश विधियुक्त पद्धतीने पुरोहितांच्या मंत्रोपचाराने आई भागवतीस समर्पित करण्यात येवून भगवतीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्तीची अध्यक्ष वर्धन पी. देसाई, विश्वस्त तथा तहसीलदार बी. ए. कापसे, विश्वस्त ललित निकम, डॉ. प्रशांत देवरे व भूषणराज तळेकर यांच्या हस्ते भगवतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी प.पू. सोमेश्वरानंद महाराज, विष्णूगीरी महाराज, शिवगीरी महाराज, दिनेशगीरी महाराज, गणेशपुरी महाराज, ऋषीकेश नंदगीरी महाराज यांच्यासह आमदार नितीन पवार, आ. देवयानी फरांदे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस उप निरीक्षक महेश निकम, सहा. पोलीस निरीक्षक बबन पाटोळे तसेच सप्तशृंगगड येथील सरपंच ग्रामस्थ, नांदूरी येथील सरपंच उपस्थित होते.
संपूर्ण पितृपक्षात १,६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान भगवतीच्या सान्निध्यात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्रापूर्वी होत आहे. शारदीय नवरात्रीच्या प्रथम दिनी अर्थात सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ रोजी भगवती मंदिर हे भाविकांना सप्तशृंगी देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.पूर्वनियोजन व सुरू असलेल्या कार्यवाहीनुसार श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे येणाऱ्या भाविकांना दरम्यानच्या मंदिर बंद काळात पहिली पायरी येथे सप्तशृंगी देवीच्या प्रतिकृतीच्या दर्शनाची पर्यायी व्यवस्था तसेच नवरात्री पूर्वी येणाऱ्या ज्योत संदर्भीय भाविकांना मशाल-ज्योत प्रज्वलित करण्याची व्यवस्थादेखील पहिली पायरी-प्रवेशव्दार येथे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रसादालय, भक्तनिवास व धर्मांर्थ दवाखाना व इतर अनुषंगिक विविध सेवा-सुविधा विश्वस्त संस्थेच्या वतीने सात्तत्यपूर्वक सुरू असतील.