जळगाव (प्रतिनिधी) : जनावरांवरील लंपी या रोगाची आतापर्यंत जिल्हयात ३९२ जनावरांना लागण झाली, तर १२ जनावरे मृत पावली असल्याचे पशु संवर्धन विभागाकडून सांगण्यात येताच ही दिलेली माहिती फसवी असल्याचा आरोप जिल्हयातील माजी मंत्री आ.एकनाथ खडसे, आ. अनिल पाटील, आ. शिरीष चौधरी, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे यांनी करताच मृत जनावरांची संख्या नेमकी किती आहे? यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
विधान परिषदेत राज्यातील जनावरांवरील लंपी रोग, जिल्हयात मृत झालेली जनावरे आणि शासनाची उदासीनता यावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शासनाला धारेवर धरल्यावर गुरूवारी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने जळगाव जिल्हयाला भेट देत रावेर तालुक्यातील लंपी रोगाने मृत झालेल्या जनावरांच्या गावांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर जळगाव, धुळे नंदुरबार जिल्हयातील अधिका-यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत दिली गेलेल्या माहितीवर आक्षेप घेताच पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले.
प्रारंभी जिल्हयात ८,४६,४०७ इतके पशुधन असून जिल्हयात लंपी रोगाने आठ तालुक्यात २९ बाधीत क्षेत्र आहे. यात ९०,१६३ पशूधनाचे लसीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हयात या रोगाने बारा जनावरांचा मृत्यू झाला असून यात ८ जनावरे ही रावेर तालुक्यातील, दोन धरणगाव तर अमळनेर व भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एक जनावर मृत झाले असल्याचे सागण्यात आले. बाधित पशूधनावर नियमित उपचार होत असून सावदा, रावेर येथील जनावरांचे बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तसेच या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून आंतरराज्य जनावरांची वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकारी कार्यालयात बसून आकडेवारी देत असतात. त्यामुळे अधिका-यांनी थेट शेतक-यांच्या गुरांच्या गोठयात जाऊन पाहाणी करावी आणि शेतक-यांना मदत करावी, अशा शब्दात अधिका-यांची कान उघडणी केली. तसेच शेतक-यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या. आ. अनिल पाटील यांनी जिल्हयात केवळ १२ जनावरांचा मृत्यू लंपी रोगाने झाला, यावर विश्वास बसत नसून यापेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे सांगताच अन्य उपस्थित आमदार व खासदारांनी त्यास दुजोरा दिला. आ. एकनाथ खडसे यांनी केवळ एकटया न्हावी गावातच १२ पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झालेला असल्याने जिल्हयाचा आकडा बारा योग्य वाटत नसल्याचे सांगत जनावरांच्या लसीकरणाबाबतदेखील प्रश्न उपस्थित केला. सध्या दिली जात असलेली लस ही लंपीसाठीच आहे काय? ती परिणामकारक आहे काय? असा सवाल करत लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित करताच विखे पाटील यांनी यावर मौन बाळगले.
वाळूचे धोरण ठरवणार
बैठकीनंतर पत्रकारांनी जिल्हयात मोठया प्रमाणावर होत असलेल्या वाळू तस्करीबाबत महसूल मंत्री म्हणून प्रश्न विचारले असता वाळू माफियांनी राज्यात उच्छाद मांडला आहे. या वाळू माफियांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातून गुन्हेगारीकरण होत आहे. त्याचा नायनाट करावा लागणार आहे. राज्यात वाळूला आश्रय कोण देत आहे, त्यांचा शोध घेऊ. तसेच शेजारच्या राज्यात वाळूचे नेमके काय धोरण आहे, त्याची माहिती घेऊन राज्यातील वाळूचे धोरण निश्चित केले जाईल असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.