Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

निर्माल्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम

निर्माल्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम

मुंबई : महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने, पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करताना निर्माल्य गोळा करण्याचे कार्य पार पडले. सदर निर्माल्याचे मशिनद्वारे भुसा तयार करून त्याचा वापर सेंद्रीय खतनिर्मितीसाठी करण्यात येणार आहे. निर्माल्यापासून खतनिर्मितीचा हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवण्यात आला असून मुंबईत जुहू चौपाटी, गिरगांव चौपाटी, बोरिवली नॅशनल पार्क येथे पार पडला. गिरगांव चौपाटी येथे नऊ हजार स्वयंसेवक कार्यरत होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित होते. या उपक्रमामुळे खतंही मिळतं आणि निर्माल्यही नष्ट केलं जातं. ते समुद्रात जात नाही. अशाप्रकारे पर्यावरणाचाही समतोलही राखला जातो. त्यामुळे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि गेली अनेक वर्षे हा उपक्रम डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सुरू आहे. तसंच पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम या राज्यामध्ये राबवले जातात. वृक्षारोपण केल्यानंतर त्याचं संगोपन, स्वच्छता मोहिम, विहीर, तलाव साफसफाई मोहिम, रक्तदानशिबीर असे विविध लोकोपयोगी उपक्रम देशभरात ते पार पाडतात. आप्पासाहेब धर्माधिकारी तर स्वच्छता मोहिमेचे ब्रॅण्ड अम्बेसिडर आहेत. तसेच त्यांचे स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने या सगळ्या कार्याला हातभार लावतात. आपल्या देशासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने लाखो स्वयंसेवक हा उपक्रम गेले अनेक वर्षे राबवत आहेत आणि असा उपक्रम शासनातर्फेदेखील देशातही राबवण्याचा आम्ही नक्की विचार करू, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या निर्माल्यातून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. साधारण ४०-५० टन निर्माल्य यातून जमा करण्यात आले आहे.

Comments
Add Comment