Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीगणपती विसर्जनाला गालबोट!

गणपती विसर्जनाला गालबोट!

विसर्जनावेळी वर्ध्यात ३, पुणे, ठाणे व धुळ्यात एकाचा मृत्यू

पनवेलमध्ये ११ जणांना शॉक!

हरियाणात एकाच कुटुंबातील ३ जणांचा बुडून मृत्यू

मुंबई : बाप्पाची १० दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर काल गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. मात्र काही ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याचे पहायला मिळाले. पुण्यातील दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेला २२ वर्षीय तरुणाचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. तर पनवेलमध्ये विसर्जन करत असताना इलेक्ट्रिक शॉकने ११ भाविक जखमी झाले. शहरातील वडघर खाडी परिसरात ही दुर्घटना घडली.

यातील सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना पनवेलमधील लाइफ लाइन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विसर्जन करताना समोरील विद्युत खांबाची वायर तुटल्याने गणेशभक्तांना विद्युत धक्का बसला असल्याचे समजते.

जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही समजते. दुसरीकडे वर्ध्यात ३ तर ठाणे आणि धुळ्यात एकाचा बुडून मृत्यू झाला.

हरियाणात एकाच कुटुंबातील ३ जणांसह ५ जणांचा बुडून मृत्यू

तिकडे हरियाणात यमुनेकाठच्या मिरारपूर घाटावर मोठी दुर्घटना घडली. गणेश विसर्जनावेळी एकाच कुटुंबातील तीन लोकांचा बुडून मृत्यू झाला. बाप लेक आणि पुतण्याचा विसर्जन करताना बुडून मृत्यू झाला.

महेंद्रगड येथील कनिना-रेवाडी रस्त्यावरील झगडोली गावाजवळील कालव्यावर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले सुमारे नऊ जण पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेले. रात्री उशिरा आठ जणांना कालव्यातून बाहेर काढण्यात आले, त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी सुनील आणि त्याचा भाचा दीपक यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सुनील यांचा मुलगा कार्तिक याचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. हे तिघेही सोनीपत येथील सुंदर सांवरी गावचे येथील रहिवासी होते.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हळहळले

महेंद्रगड आणि सोनीपत जिल्ह्यात गणपति विसर्जनादरम्यान काही गणेश भक्तांचा मृत्यू झाला. या कठीण काळात मृतांच्या कुटुंबियांच्या आणि नातेवाईकांच्या सोबत आम्ही आहोत. एनडीआरएफच्या टीमने काही लोकांना वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जखमी लोक लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -