ठाणे (प्रतिनिधी) : मी फिरायला लागल्यामुळे अनेक लोक फिरायला लागले आहेत. त्यांना मिळणारे पुण्य हे मी फिरल्यामुळे मिळत आहे. त्यामुळे त्यांनी ते पुण्य आनंदाने घ्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भाषेत अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ठाण्यातील नवरात्रौत्सव मंडळाच्या मंडप पुजेवेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिले. राज्यकारभार सोडून गणपती दर्शनात व्यग्र असलेला मुख्यमंत्री अशी टीका विरोधकांनी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.
आपली संस्कृती आणि परंपरा याचे मी जतन करत आहे. काही लोक म्हणतात, मी कॅमेरे घेऊन जातो. पण माझ्याकडे कॅमेरा नसतो, लोक माझ्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करतात. मी प्रत्येक ठिकाणी जातो. तेथील लोकांना असं वाटत की, हा आपला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्या भावनेने फोटो काढायला येतात. लोकांना ज्याच्या जवळ जावसं वाटत त्याच्याकडेच फोटो काढायला येतात. आता बाकी लोकांच्या जवळ ते का जात नाहीत, त्याचे उत्तर मी देऊ शकत नसल्याचे सांगून खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला.
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याची टीका त्यांनी केली होती. एक मुख्यमंत्री राज्याचा कारभार पाहण्यासाठी आणि एक मुख्यमंत्री फिरण्यासाठी हवा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. याशिवाय, अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. या सगळ्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागते. लोक मला आपुलकीने बोलवत असतात त्यामुळे त्यांना नाकारता येत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.