विलास देवळेकर
मुंबईतील एका प्रसिद्ध श्री गणेश मंडपात तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक मंडळी ही सजावट २ वर्षांनी मनासारखं पूर्ण झाल्याच्या आनंदात – समाधानात ‘बुधवार’च्या पहाटे “चहा बिस्कीट”चा आस्वाद घेत, आज सकाळी सकाळी आपल्या बाप्पाचं दर्शन-देखावासहित लोक पाहतील. आपले नाव होईल, आपल्याला “व्हाॅट्सॲपवर- फेसबुकवर आणि टीव्ही चॅनेलवर” प्रसिद्धी मिळेल. किती छान ना, किती आनंद ना !
अशा प्रकारे एकमेकांत चर्चा होत असताना, अचानक सर्व लाईट बंद होते आणि फक्त आणि फक्त “गणेश मूर्तीवर” प्रकाश दिसत होता आणि आवाज आला, “प्रिय भक्तांनोऽऽऽ, इकडे लक्ष द्या, मी, मी गणेश, तुमच्या सर्वांच्याच लाडका गणपती बाप्पा बोलतोयऽऽऽ. “
सर्वजण एकमेकांकडे पाहत, ओरडायला रागात बोलायला लागले. कोण भंकस करतोय? आधी लाईट लावा? आणि कोण आवाज काढतोय? डोक्यात जाऊ नका? कोण आहे, त्याने समोर या? असे ज्येष्ठ नागरिक आणि मुलं-मुली तसेच, प्रौढ माणसे ओरडायला लागले. तेव्हा पुन्हा एकदा “गणेश मूर्ती”वरची लाईट चमकली आणि आवाज घुमू लागला. “प्रिय भक्तांनोऽऽऽ, मी तुमचा गणेश, गणपती बाप्पा, पार्वती-शंकराचा सुपुत्र आणि कार्तिकचा छोटा भाऊ, तुमच्या सर्वांच्याच लाडका गणपती बाप्पा बोलतोयऽऽऽ.”
सर्वांना आश्चर्य वाटले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘आनंद’ ओसंडून वाहत होता. तेव्हा ज्येष्ठ नागरिक कुलकर्णी नाना म्हणाले, “देवा, आमचे काही तरी चुकले आहे का?” गणेश, गणपती बाप्पा बोलू लागले, “अरे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहेऽऽऽ. कारण तुम्ही सगळ्यांनी, इतकी खूप मेहनत घेतली, सजावट केली आणि आता १० दिवस सेवा करणार आहात. खरंच मी मनापासून आनंदी आहे, पण दुःखी ही आहेऽऽऽ.”
“दु:खी आहे????” असे
सर्वच उपस्थितांमध्ये ओरडू लागले.
“माझ्या भक्तांनो, शांत व्हा. मी त्याचे कारणही सांगतोऽऽऽ. तुम्ही मला आणताना, रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते. लोकांना जाता येता त्रास होतो. सगळे कामधंदेवाले आहेत. मंदीमुळे-कोरोनामुळे नोकरीचे टेन्शन आले आहे. पण त्यातील कोणी बोलत नाही. पण आपण मात्र समजून घेतले पाहिजे ना. तेव्हा माझे आवाहन आहेऽऽऽ.”
“क्या बात है देवा?” केळेवाला राजू भैया अति उत्साहाने म्हणाला.
तेव्हा बाप्पा बोलू लागला, “आधी माझी छोटीशी मूर्ती, पुढच्या वर्षापासून आणा. म्हणजे लोकांना त्याचा त्रास होणार नाही. कारण की, मागे पाच वर्षांपूर्वी रस्त्याच्या खड्ड्यातून, मी सुटलो नाही आणि आता तुम्हाला माहीत असेलच, पाच वर्षांपूर्वी “मोबाइल-बातमी चॅनलद्वारे” पाहिले असेल की, सुरतमध्ये माझी २९ फुटांची मोठी मूर्ती आणताना, वरच्या खांबाच्या विजेच्या तारेचा, माझ्या मुकुटाला धक्का लागला आणि दहाजणांना झटका बसला. तीन जण जागीच मृत्यू आणि, सातजण गंभीर जखमी झाले होते. पण मी मात्र, काहीच करू शकलो नाही. म्हणूनच पुढच्या वर्षापासून सर्वांनीच, छोटी मूर्ती आणा. दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही जी वर्गणी गोळा करता, ह्या महागाईच्या काळात, कोणाला जमते, तर कोणाला नाही जमते. काहींच्या नोटाबंदीमुळे आणि कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे ते कसं तरी संसार चालवत आहेत. पण ते जे काही स्वखुशीने देतील, तेच घ्या.”
“पण देवा, ” खजिनदार गोपीनाथ मध्येच बोलू लागले. “पण देवा, अशाने सजावटीचा- लाईटचा- डिजेचा- ढोलताशाचा-ऑर्केट्राचा खर्च कसा काय निघणार
बुवा ? ”
तेव्हा बाप्पा शांतपणे म्हणाला, ” भक्तांनोऽऽऽ, तुम्हाला मी प्रसन्न व्हायला पाहिजे ना ? ”
” होय महाराजा ” चंदू आणि मंजू हात जोडून ओरडले.
बाप्पा पुढे बोलू लागला, “तर मग, डिजे- जोरात वाजवू नका. आजारी ग्रस्त व विद्यार्थी आणि लहान बाळांना- वृद्धांना त्यांचा त्रास होत असतो. तसेच इतर लोकांना ही हृदय त्रास होत असतो. याचा आपण सगळ्यांनी भान ठेवावे. मग मी सांगतो तसे करालऽऽऽ ? ”
” बोला, बोला बाप्पा.” अप्पाने हाक दिली.
“भक्तांनोऽऽऽ, तुम्ही जी वर्गणी गोळा करून, जो मोठा खर्च करता, त्या पेक्षा “गोरगरिबांनांच्या आरोग्य खर्च, त्यांच्या शैक्षणिक खर्च-दुष्काळग्रस्तांना-पूरग्रस्तांना” इतक्यात, आबा पाटील मिशीला ताव मारत म्हणाले, देवा, ” ते तर आम्ही करतोच की.”
“अरे मला माहीत आहे. पण पुढे तर ऐकाल की नाही ? “आबा पाटीलला मध्येच थांबण्याचा इशारा बाजूवाल्यांनी दिला.
पुढे बाप्पा बोलू लागले, “शहिदांच्या घरांना- आदिवासींना, तसेच गरिबांना आणि होतकरु विद्यार्थ्यांना- खेळाडूंना मदत” करा. तसेच “समाजातील समाज सेवकांचा-खेळाडू-विद्यार्थी-साहित्यिक-समाज प्रबोधनकार कवींचा, तसेच पर्यावरणकारांचा सत्कार- पुरस्कार” देऊन, त्यांना प्रोत्साहित करा. माझा फोटो आणि तुमचा फोटो पदाधिकारीच्या नावासकट बॅनर लावून, मदतीचा ‘जनजागृती’ चा जागर एखाद्या पक्षाप्रमाणे करा. त्यामुळे माझ्या सोबत, तुमच्या मंडळाचे नाव होईल आणि आपल्या माहितीप्रमाणे, “व्हाॅटस्ॲपवर- फेसबुकवर-नि चॅनेलवर” प्रसिद्ध मिळेल. हा खरा माझ्यासाठी जागृत “देखावा” आहे. आणि ते पाहून दुसरे गणेश मंडळे ही अशा प्रकारे, “मदतीला” धावून येतील. ज्या राष्ट्रपुरुषांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्याची अंमलबजावणी कृतीतून करण्यासाठी, ज्या “मुलींवर-महिलांवर आणि कोणाच्या घरावर” अत्याचार होत असेल तर, जात धर्म पाहू नका. त्यांना कायद्याने न्याय मिळवून देण्यासाठी, माझ्या “झेंडाच्या बॅनरचा” वापर करून, रस्त्यावर एकत्र या. कोणाकोणावर गावात-शहरात अत्याचार- अन्याय होत असेल तेव्हा, सर्व “गणेश मंडळांनी पुढाकार” घेऊन, कोणतेही नुकसान न करता, कायदेशीर न्याय मिळवून द्यावा. हिच खरी तुमची गणेश शक्ती दिसेल, आणि मला आपली भक्ती मिळेलऽऽऽ. ”
“व्हय देवा, तुम्ही जसं बोलताव तसं आम्ही करताव.” असे मन्या मान हालवून म्हणाला.
” आणि अजून एक काम करा—‘ ” बाप्पा आतुरतेने- अपेक्षेने म्हणाला.
” काय ता देवा? ” बबन्या काळजीने म्हणाला.
बाप्पा पुढे बोलू लागला, ” या पुढे, पुढच्या वर्षापासून, गावात-खेड्यात- शहरात १२ मुर्तींची एकच मुर्ती. म्हणजेच १२ गणपती वाल्यांची, एकच गणेश मूर्ती. ती पण छोटी आणि ती ही मातीची असावी. म्हणजे “नदी- तलाव- समुद्राला” दूषितपणा न करता, कृत्रिम तलाव करुन, माझं विसर्जन करा आणि त्या मातीत नवीन रोपे लावा. म्हणजे पर्यावरणालाही जपले जाईल. त्यामुळे तिथे खरा उत्सव साजरा करायला-पहायला मिळेल. तो खरा आनंद.ती खरी श्रद्धा, ती खरी भक्तीऽऽऽ. जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही. आवाज नाही. वर्गणी ही स्वखुशीने देतील. “जल-वायू-ध्वनी” प्रदूषण होणार नाही. त्यामुळे खर्च कमी आणि मदत जास्त मिळेल- करता येईल आणि त्यात आनंद-उत्साह अधिकऽऽऽ. आणि विशेष म्हणजे, उत्सव व एकोपा दिसेल. हे माझे छोटसं आवाहन सर्व “गणेश मंडळांना” आहे. आणि मोठ मोठ्या मूर्त्यांची स्पर्धा करु नका. ते आपण स्वीकारल काऽऽऽ? ”
मंडळाच्या सर्व सभासदांनी ओरडून साद दिली.
” होय महाराजा !! ”
” माझे प्रत्येक जाती धर्माचे भक्त आहेत. पण—‘
” बाप्पा नाराजीत बोलू लागला.
” आता पण काय देवा?” सर्वांना चहा बनवून देणारी, गोंद्या आक्का आजी बोलू लागली.
तेव्हा बाप्पा नाराजीत बोलू लागले, “पण जे तोंडात तंबाखू, ओठात सिगारेट आणि पोटात दारू , तसेच गाडी चालवताना ईकडे तिकडे थुंकणारे, आणि कानाला हेडफोन लावणारे, असे माझे भक्त होऊच शकत नाही. माझे भक्त कसेऽऽऽ? ”
” सांगा देवा, आपले भक्त कसे आहेत? ” अण्णा शेठनी विचारले.
आता बाप्पा समजावून अभिमानाने सांगू लागले, ” माझा भक्त असा आहे, जो जातीचा भेदभाव न करणारा, जो आपल्या आई वडिलांना सांभाळणारा, मित्रत्वाचे नातं जपणारा, संकटात प्रत्येकाला मदत करणारा, प्रत्येक घराजवळ झाडे लावणारा, पाण्याची- विजेची व कचराची बचत करणारा, आपला परिसर स्वच्छ ठेवणारा, निसर्गावर प्रेम करणारा, हा माझा खरा भक्त- मित्र आहेऽऽऽ. ”
” होय महाराजा !! ” असे सर्वांनीच साद ला प्रतिसाद दिला. पुन्हा पुढे बाप्पा बोलू लागले, “आणि हे सर्व आपली नोकरी- घर- तब्येत सांभाळून करा. आणि माझ्या दर्शनासाठी, येणाऱ्या प्रत्येक भाविकांना भक्तांना धक्का बुक्की न करता, त्यांना सुरक्षित- संरक्षण देऊन, चोरट्यांपासून सावधपणे लक्ष ठेवून, मनोभावे दर्शन द्यावे. भक्त खुश तर मी खुश, आणि मी खूश तर गणेश मंडळे खूश ! तथास्तूऽऽऽ !! ”
असे म्हणताच, सर्वीकडे आपोआपच “विद्युत रोषणाई” झाली. तसे सगळेजण जल्लोषात टाळ्या वाजवून, शिट्ट्या वाजवून म्हणाले,
गणपती बाप्पा मोरया
सर्वांनी निसर्गावर प्रेम करूया !!