Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ

पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ

दोन वर्षांच्या कालावधीनंतर महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. राज्य सरकारने यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा केल्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. विद्येचा देवता गणेश, सुखकर्ता गणेश, विघ्नहर्ता गणेश अशा विविध रूपांमध्ये गणेश भक्त गणेशाची सेवा करत असतात. गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. कोरोना महामारीमुळे औद्योगिक तसेच कौंटुबिक अर्थकारण गेल्या दोन वर्षामध्ये मंदावले असल्याकारणाने यंदाच्या गणेशोत्सवाच्या आयोजनाच्या व्यापकतेवर सुरुवातीच्या काळात प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते; परंतु गणरायाच्या स्वागतामध्ये सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवाच्या आयोजनामध्ये भाविक मंडळी तसूभरही कोठे कमी पडली नाही. येणार येणार म्हणून भाविक गणरायाची गेल्या काही महिन्यांपासून गणरायाची वाट पाहत होते. गणराया आला, अकरा दिवस मुक्काम करून भक्तांकडील यथाचार पाहुणचार घेऊन गणराज आज आपल्या घरी निघणार आहेत. निर्बंधमुक्त या शब्दाचा अर्थ असा होता की, उत्सवामध्ये कोठेही अडथळे येऊ नयेत, भाविकांच्या उत्साहावर व भक्तीवर कोठेही गालबोट लागू नये असा होता; परंतु भाविकांनी तुम्हारे इन भक्तों मे हम से बढकर कौन असे जगाला सांगण्यासाठी स्पीकर व डीजेचा कानठळ्या बसविणारा आवाज गणेशोत्सव मंडपांमध्ये दणाणत होता. ध्वनिप्रदूषणात वाढ झाली. दीड दिवसाचा, पाच दिवसांचा, सहा दिवसांचा, सात दिवसांचा गणेश विसर्जन करताना नाचगाण्यात दंग झालेल्या भाविकांना आपण मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण करत आहोत, याचे त्यावेळी भानही राहिले नव्हते.

गणराया हा खऱ्या अर्थांने विघ्नहर्ता आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून मुंबई शहर-उपनगरातील, कल्याण, ठाणे, डोंबिवली, उरण-पनवेल, नवी मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव भाविकांमध्ये नावारूपाला आले आहेत. या गणरायांचे दर्शन घेतल्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होत नाही, अशी भक्तांची धारणा असल्याने नावाजलेल्या गणेशोत्सवाच्या मंडपांपुढे लागलेल्या लांबलचक रांगा गणेश मंडळांचा महिमा वाढवत होत्या. अवघ्या १० दिवसांचा यंदाचा गणेशोत्सव, परंतु या दहा दिवसांच्या उत्सवामध्ये करोडो रुपयांचे अर्थकारण घडले. पैशांची उलाढाल वाढली. अर्थकारणाला गती मिळाली. गणेश मूर्ती बनविणारे मूर्तिकार, मंडपवाले कलाकार, मोदक, पेढे यामुळे मिठाईच्या दुकानात वाढलेली वर्दळ. हार बनविणारे हारवाले, फुलवाले, प्रवासी वाहने, स्पीकर, डीजेचे साहित्य विक्री करणारे, इतकेच काय एमएसईडीसीच्या अर्थकारणात उलाढाल झाली. देवाचे राखण करण्याच्या नावाखाली पत्ते पिसण्याचीही हौस-मौज अनेकांना भागविता आली. सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांची उडणारी झुंबड, लांबलचक रांगा आणि गर्दीवर नियंत्रण मिळविताना कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना करावी लागणारी तारेवरची कसरत यातच कोणा भाविकाला नियंत्रित करताना चुकून कार्यकर्त्यांकडून आगळीक घडल्यावर मीडियातून होणारा टीकेचा भडीमार ही गेल्या काही वर्षांपासून नित्याचीच बाब झाली आहे. आगळीक घडल्यावर कार्यकर्ता असो अथवा स्वयंसेवक असो, त्याला माफी नाही, अथवा चुकीचे समर्थक करणेही शक्य नाही. पण टीकेचा भडीमार करण्यापूर्वी त्या कार्यकर्त्यांची मानसिकता व घडल्या प्रकाराबाबतची वस्तुस्थितीही त्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारणी, गणेश मूर्तीचे आगमन-विसर्जन, उत्सवाचे आयोजन, अकरा दिवसांचे नियोजन, कार्यकर्त्यांचा मनोमिलाफ, प्रत्येकाचा इगो, रुसवे-फुगवे जपणे यातून हा उत्सव साजरा करायचा असतो. दिसायला उत्सव दहा-अकरा दिवसांचा दिसत असला तरी गणेशोत्सवापूर्वी कार्यकर्त्यांना पंधरा दिवस ते महिनाभर अगोदर राबराब राबावे लागते. गणेशोत्सव संपल्यावरही हिशोब लावण्यासाठी आठ दिवस मेहनत करावी लागते. गणेशोत्सव आयोजनात काढता पाय घेणारे तसेच लांबून मज्जा पाहणारे घटक गणेशोत्सव संपताच हिशोब जाहीर करण्यासाठी तगादा लावत असतात. गणेशोत्सवापूर्वी खर्चाची जमाबेरीज करण्यासाठी घरोघरी चपला झिजवाव्या लागतात. विविध स्पॉन्सर शोधावे लागतात. कमानीसाठी कोण जाहिरातदार असेल याचा शोध घ्यावा लागतो. हे झाल्यावर अकरा दिवस सकाळ-संध्याकाळची गणपतीची आरती, महाप्रसादाचे नियोजन, सत्यनारायण पूजेचे आयोजन, दररोज भाविकांच्या लांबलचक लागणाऱ्या रागांवर ठेवावे लागणारे नियत्रंण यामध्ये कार्यकर्त्यांचे हाल होत असले तरी त्यांचा उत्साह कायम असतो. मुखी गजाननाचा जयघोष असतो.

गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडला तरी त्या दोषाचे सरसकटपणे खापर स्वयंसेवक यांच्यावर फोडून सर्वच मोकळे होतात. सोशल मीडियावर या घटनेवर भाष्य करताना अनेकजण आपल्या अकलेचे तारे तोडून आपली बुद्धिमत्ता पाजळत असतात, यामुळे गणेशोत्सव मंडळाचीच आपण प्रतिमा मलीन करत आहोत याचेही भान अनेकांना नसते. मंडळ नावारूपाला येण्यासाठी काही कालावधी जावा लागतो, परंतु नावलौकिक जाण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे टीकाकारांनी अशा घटना घडल्यावर सत्यता जाणून घ्यावी. संयम बाळगून सत्यता जाणून घ्यावी. गणरायालाही आता आपल्या घराचे वेध लागले असणार. दहा दिवस भाविकांकडून सेवा करून घेतल्यावर कैलासावर जाण्यासाठी बाप्पासह त्याचे वाहनही मूषकराज सजून बसले असणार. बाप्पाच्या जाण्याचा वियोग भक्तांना सहन होत नसला तरी आपल्या डोळ्यांतील अश्रू लपविण्याचे काम वर्षानुवर्षे भक्तमंडळी करत असतात. गणरायाला आणताना जो उत्साह, जल्लोष असतो, तोच उत्साह व जल्लोष विसर्जनातही असतो. बाप्पा तुम्ही भूतलावरील वास्तव्यात सर्व जवळून पाहिले आहे. अनुभवले आहे. भक्तांच्या अडचणी सोडव, विघ्नहर्त्या त्यांना समस्यामुक्त कर आणि पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येऽऽऽ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -