मुंबई : अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कब्रस्तानची जबाबदारी महापालिकेकडे असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदच्या माणसाच्या कबरीचे सुशोभिकरण सुरू आहे. पेग्विन सेनेने आता कबर बचाव कार्यक्रम सुरू करून पेग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी त्याचे नेतृत्व करावे, असा घणाघात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केला आहे.
याकूब मेननला जिवंत ठेवा अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी केली होती. सत्तेत असताना शिवसेना दाऊदची समर्थक होती हे आम्ही पाहिले. शिवसेना आता दाऊदची प्रचारक झाली आहे, असा खळबळजनक आरोपही आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर केला आहे.
याकूब मेननला जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसने मांडलेली भूमिका होती. त्यावेळी केंद्रात कुणाचे सरकार होते? गृहमंत्री कोण होते? याचे उत्तर काँग्रेसने पहिले द्यावे. सुप्रीम कोर्टात काँग्रेसने काय भूमिका मांडली होती? पाकिस्तानच्या मदतीने दाऊदने भारतावर, मुंबईवर हल्ला केला. त्यातला प्रमुख आरोपी याकूब मेनन ज्याला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने फाशी झाली. मग त्याच्या कबरीवर सुशोभिकरणाची परवानगी दिली कशी? असा सवाल शेलार यांनी केला आहे.