मुंबई : याकूब मेमनच्या कबरीची सजावट केल्याने सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून आता या कबरीवरुन एलईडी लाईट्स हटवण्यात आले आहेत. मात्र आता या प्रकरणाला राजकीय रंग लागण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननला ७ वर्षापूर्वी फाशी दिल्यानंतर मुंबईच्या बडा कब्रिस्तान येथे दफन करण्यात आले होते. मात्र त्याच्या कबरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. याकूबच्या कबरीचे मार्बल आणि लायटिंगने सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यावरून भाजपाने मागील महाविकास आघाडी सरकारला दोषी धरत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणासाठी अलिखीत परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली. मविआ आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी किती तडजोड केली हे यावरून स्पष्ट झाले आहे. भाजपा या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खालावली. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
तसेच याकूबची कबर सुशोभिकरणासाठी ज्यांनी मदत केली त्यांची नावे समोर आणा. हे देशद्रोही कृत्य असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तत्कालीन सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होते. कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला म्हणवणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड का केली? याचे स्पष्टीकरण जनतेला दिले पाहिजे. या प्रकारासाठी सरकारमध्ये कोण कोण समाविष्ट होते ते समोर आले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात कित्येक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर २०१५ साली त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आता त्याच्या कबरीला संगमरवरी फरश्या लावण्यात आल्या असून एलईडी बल्ब लावण्यात आल्याची माहिती आहे. रक्तपात घडवून कित्येक निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या मेमनचे उदात्तीकरण करण्यात येतंय का? असा प्रश्न निर्माण होत असून अनेक नेत्यांकडून याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणाचे उत्तर द्यावे लागेल, असे वक्तव्य भाजपच्या राम शिंदे यांनी केली आहे. तर असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.
दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून..
याकूब मेमन ची कबर सजवत बसले..
आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका!!— nitesh rane (@NiteshNRane) September 8, 2022
“दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून याकूब मेमनची कबर सजवत बसले आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका!!.” असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.