मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई आणि कोकणात सायंकाळी जोरदार पुनरागमन केले. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात संध्याकाळी ५ वाजल्यापासून आकाशात काळे ढग दाटून आले. त्यामुळे अंधार दाटून आला होता. त्यानंतर वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. आकाशातील काळ्या ढगांची गर्दी पाहता पावसाचा जोर आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात गुरुवारपासून पावसाचा जोर राज्यात वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रासह, मराठा, विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार शुक्रवारी अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.