Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यपती-पत्नींनी चारचौघांत एकमेकांचा आदर ठेवणे अत्यावश्यक

पती-पत्नींनी चारचौघांत एकमेकांचा आदर ठेवणे अत्यावश्यक

मीनाक्षी जगदाळे

समाजात अनेक पती-पत्नी विविध कारणास्तव वाद-विवाद, कलह, भांडण यामुळे त्रस्त असतात. आपल्या अनेक लेखांमार्फत आपण या विषयावर सखोल मार्गदर्शन करीत आलो आहोत. पती-पत्नीतील वादांची, मतभेदांची नानाविध कारणे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे आणि त्रासदायक कारण म्हणजेच पती-पत्नींनी समाजात, कुटुंबात वावरताना एकमेकांबद्दल आदर न बाळगणे.

अनेक नवरा-बायको एकांतात, वैयक्तिक पातळीवर जे काही बोलतात, चर्चा करतात, त्यामध्ये वादावादीदेखील होते, एकमेकांचा अपमानसुद्धा होतो. पण ही बाब चार भिंतीच्या बाहेर जात नाही, तर काही पती-पत्नींना अतिशय चुकीची आणि वाईट सवय असते की, आपल्या जोडीदाराच्या चुका, त्याची चुकीची वागणूक, त्याच्या चुकीच्या सवयी, त्याचे स्वतःला न पटणारे निर्णय, मत याबाबत जाहीर टीका करणे. मग ते कुटुंबातील लोकांसमोर असोत अथवा मित्र-मैत्रिणी नातेवाईक असो किंवा समाज असो. सार्वजनिक ठिकाणी आपल्या पतीच्या अथवा पत्नीच्या स्वभावातील उणीवा, त्याच्या चुका, त्याची वागणूक याबद्दल जाहीर खिल्ली उडवणे, एकमेकांना अपशब्द वापरणे, एकमेकांना अपमानित करणे खूपदा होताना दिसते.

खरे तर पती-पत्नीला एका रथाची दोन चाके म्हटले आहे. पत्नीला अर्धांगिनी म्हटले आहे त्यामुळे दोघांचे विचार, मत, वागणूक ही नेहमीच परस्परांना सावरून घेणारी, सांभाळणारी, एकमेकांच्या चुकांची जाहिरात न करता, आपसांत सामावून घेणारी असणे अभिप्रेत आहे. एकमेकांच्या उणिवा, कमतरता झाकून, त्यावर दोघांमध्येच चर्चा करून, योग्य तो निर्णय घेऊन कुटुंबासमोर, समाजासमोर वावरणे योग्य असते. आपणच जर आपल्या माणसाचा मान सन्मान ठेवला नाही, तर इतर कोणीही त्याला मानपान देणार नाही. ही साधी गोष्ट अनेकांना समजत नाही. पत्नीची अथवा पतीची एकमेकांनीच चारचौघांत इज्जत काढणे, वावगं बोलणे, दुर्गुण अथवा कमतरता सांगून बदनामी करणे इतरांच्या पथ्यावर पडत असते. याच परिस्थितीचा, याच माहितीचा आधार घेऊन कुटुंबातील इतर लोक आपला संसार जास्तीत-जास्त कसा दुभंगला जाईल असा प्रयत्न करतात. घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी कोणीही कोणतीही मर्यादा न ठेवता आपल्याच पती अथवा पत्नीला वाटेल तसे बोलायला मोकळे होतात. एकमेकांची प्रतिमा उंचावता येत नसेल, मोठेपणा देता येत नसेल तरी निदान एकमेकांना खाली मान घालायला लागू नये इतपत काळजी घेणे दोघांचे कर्तव्य आहे. आपलंच कुटुंब असलं, आपलीच लोक असली तरी पती-पत्नीचं नातं अतिशय खासगी स्वरूपाचे असते आणि ते तसेच असणे अपेक्षित आहे.

घरातील सगळ्यांसमोर, चव्हाट्यावर जेव्हा पती-पत्नींतील कोणत्याही नकारात्मक गोष्टी यायला लागतात, तेव्हाच नात्यात फुट पडायला सुरुवात होते. कुटुंबातील असो वा समाजातील प्रत्येकाला स्वतःच झाकून ठेऊन दुसऱ्याच वाकून पाहण्यात आनंद असतो आणि असे वागून आपण लोकांना तो आनंद फुकटात मिळवून देत असतो. आपल्या नात्यात अजून दुरावा आणण्यासाठी अनेकजण टपलेलेच असतात आणि आपण त्यांना असे वागून सुवर्णसंधी देत असतो.

माझ्या भावासमोरच तर बोललो तुला, तुझ्याच मैत्रिणीसमोर मस्करी केली न?? आपलीच मुलं आहेत त्यांना काय समजत अजून? माझ्या बहिणीसमोर तर बोललो तुला, नणंद आहे तुझी तिच्यापासून काय लपवायचं? माझ्या मित्रासमोर तर झाले न वाद. ते काय परके आहेत का, हे तर आपल्याच घरातले आहेत, घरासारखे आहेत, माझ्या आई-वडिलांसमोर अपमान झाला, तर काही बिघडत नाही मोठे आहेत ते वयाने. समजून घेतात, ते नातेवाईक लहानपणापासून ओळखतात मला. त्यांना सांगितल्याने काय होते?, त्या पाहुण्यांना माहिती आहे आपल्या घरची परिस्थिती आणि तुझा स्वभाव त्यात काय एवढे! परस्परांना अशी कारण देऊन नवरा-बायको त्यांचं आयुष्य सगळ्यांसमोर उघड करत जातात आणि नंतर त्याचा प्रचंड मनस्ताप त्यांना सहन करावा लागतो.

प्रत्येक वेळेस पती-पत्नी मुद्दाम ठरवून किंवा पूर्वनियोजन करूनच सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना चुकीचे बोलतात असे नाही तर अनेकदा परिस्थितीनुसार देखील ते बोलले जाते. खूपदा केवळ चेष्टामस्करी गंमत चिडवणे यासाठीसुद्धा नवरा-बायकोमध्ये चुकीचे संवाद घडतात. पण त्यावेळी तिथे उपस्थित असलेले इतर लोक याच वाक्याचा, वक्तव्यांचा, शब्दांचा विपर्यास करून त्याबाबत सर्वत्र चर्चा करतात. यामुळे त्या पती-पत्नीतील नात्याबाबत चुकीची माहिती बाहेर पसरते आणि त्यातून त्यांची बदनामी होते. त्यामुळे आपण जरी हसतखेळत एकमेकांना कोणत्याही स्तरावर जाऊन चारचौघात अथवा एकत्रित कुटुंबात बोलत असाल तरी मर्यादा सोडून पती-पत्नींनी एकमेकांची चेष्टामस्करी करताना, टोमणे मारताना मर्यादा पाळणे आवश्यक आहे. घरातील अथवा समाजातील प्रत्येकजण अशा गोष्टी हसून विसरून जाणार नाहीत, तर त्याचा अवडंबर करून, तिखट मीठ लावून आपल्या मस्करीचे कुस्करीत रूपांतर करतील.

पती-पत्नीमधील कोणत्याही खासगी गोष्टींची जाहीर चर्चा होऊ न देणे, एकमेकांचा पाणउतारा, निंदानालस्ती जगजाहीर न करणे हा सुदृढ नातेसंबंध टिकवण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे परिस्थितीचे भान, आजूबाजूच्या लोकांचे विक्षिप्त, विचित्र स्वभाव लक्षात घेऊन आपणच आपल्या मर्यादा पाळाव्यात. कोणीही सहजासहजी आपल्या पत्नीबद्दल किंवा पतीबद्दल वाटेल तसे, वाटेल ते बोलणार नाही, अनादर करणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी. त्यामुळे तू किंवा तुम्ही मला सगळ्यांसमोर असं का बोललात, तस का वागलात? यासारख्या विषयांमुळे भविष्यात मोठी होणारी भांडण तरी वेळेत थांबतील.

आपल्या मुलांसमोरदेखील अनेक नवरा-बायको एकमेकांना घालून पाडून बोलतात. जर आई-वडीलच परस्परांचा आदर करीत नाहीत, तर आम्ही तरी त्यांचा आदर का ठेवावा, आई-वडीलच एकमेकांना कुटुंबातील सगळ्यांसमोर सतत अपमानित करतात, तर आपण त्यांना उलट उत्तरे दिली, तर त्यांनी कोणत्या अधिकाराने आम्हाला रागवावे? असे प्रश्न मुलांना पडणे स्वाभाविक आहे. आमचे आई-बापचं जर लोकांसमोर कसे काय वागायचे बोलायचे याचे तारतम्य ठेवत नाहीत, तर आम्हाला त्यांनी सारखं का रागवावं. मोठे असून यांना भान राहत नाही, तर आमच्याकडून का शिस्तीची अपेक्षा करतात, असे प्रश्न निष्पाप मुलांना पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कुटुंबात आणि समाजात वागताना, वावरताना पहिले पती-पत्नींनी आपल्या मनावर संयम ठेवणे आणि मुलांच्या मनावर होणारे विपरित परिणाम थांबवणे अत्यंत गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -