Friday, March 21, 2025
Homeदेशमहाराष्ट्रासह देशातील ५० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

महाराष्ट्रासह देशातील ५० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

नवी दिल्ली : कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी अनेक व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सुरु असून आज आयकर विभागाने महाराष्ट्रासह देशातील ५० ठिकाणी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्लीपासून, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके पोहोचली असून, चौकशी सुरु आहे. कर चुकवेगिरी प्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तसेच महाराष्ट्रातील औरंगाबादमध्येही आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

राज्यातील औरंगाबादमध्ये पहाटे चार वाजल्यापासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. हा व्यापारी शिवसेनेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काही धान्य व्यापाऱ्यांवर ही छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबादेत एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर आणि घरावर अशा ४ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत. सकाळी चार वाजल्यापासून अतिशय गुप्तपणे ही सगळी कारवाई सुरु आहे.

तर राजस्थानमध्ये माध्यान्ह भोजनातून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये गृह राज्यमंत्री असलेल्या राजेंद्र यादव आणि मिड डे मील बिझनेस ग्रुपवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मंत्री राजेंद्र यादव यांचा कोतपुतळी येथे पोषण आगार कारखाना आहे.

दरम्यान, मागच्याच महिन्यात महाराष्ट्रातच २४ ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. यामध्ये पंढरपूरमधील उद्योजक अभिजीत पाटील यांच्याशी निगडित असलेल्या तीन साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. तसेच सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी टाकल्या होत्या. सोलापुरात सात ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती रडारवर होते. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -