रांची (वृत्तसंस्था) : झारखंडमधील रांची जिल्ह्यातील गावात तिहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना समोर आली आहे. जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून तीन महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. यात तिन्ही महिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
सोनहपुत पोलिस ठाण्यांतर्गत रांडीह गावात झालेल्या हत्येप्रकरणी महिलेचा पती आणि मुलासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. तर उर्वरितांचा शोध सुरू आहे, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) कौशल किशोर यांनी मंगळवारी सांगितले.
गावातील काही लोकांनी तीन महिलांना काठ्यांनी मारहाण केली. या तिन्ही महिला जादूटोणा करीत असल्याचा त्यांना संशय होता. महिलांच्या मृत्यूनंतर मृतदेह या लोकांनी गावाजवळील डोंगराळ भागात फेकून दिले. रविवारी दोन मृतदेह सापडले, तर तिसरा मृतदेह सोमवारी सापडला, असे पोलिसांनी सांगितले.
महिलेच्या पुतण्याने दिलेल्या फिर्यादीत आरोपींमध्ये पतीचेही नाव असल्याने पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जादूटोण्याच्या संशयावरून होणारी हत्या हे राज्यातील मोठे सामाजिक दुष्कृत्य आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोनुसार, २००१ ते २०२० या कालावधीत एकूण ५९० लोकांची जादूटोण्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली.