नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने याबाबत उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (युपीसीए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले असल्याची माहिती समोर येत आहे. तो आता ख्रिस गेल, कायरन पोलार्ड इत्यादींप्रमाणे देश-विदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
सुरेश रैना हा टी-२० फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखले जाते. रैनाने आयपीएलमधील २०५ सामन्यांमध्ये ३२.५ च्या सरासरीने आणि सुमारे १३७ च्या स्ट्राइक रेटने ५५२८ धावा केल्या आहेत.
सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जला तीन वेळा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, २०२० मध्ये सुरेश रैनाची आयपीएल कारकीर्द शेवटच्या दिशेने गेली. संघ व्यवस्थापनाशी वादामुळे सुरेश रैनाला २०२० चा आयपीएलमध्ये भाग घेतला नाही. त्यानंतर २०२२ मध्ये त्याने आयपीएल मेगा लिलावात १ कोटी बेस प्राईस ठेवली होती. मात्र त्याला कोणी विकत घेतले नाही.