नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँक ही ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजावर बारकाईने नजर ठेवते. बँकेकडून निर्देशांचे पालन नाही केले तर कारवाई करते. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकने पाच सहकारी बँकांनी निर्देशांचे पालन न केल्यामुळे त्या बँकावर दंडात्मक कारवाई केली आहे. या सहकारी बँकेत ठाणे भारत सहकारी बँकेचा देखील सामावेश आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘कर्नाटक राज्य सहकारी एपेक्स बँक लिमिटेड’वर हाऊसिंग फायनान्सच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे २५ लाखांचा दंड ठोठावला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याआधीही आरबीआईने निर्देशांचे पालन न केल्यामुळे आठ सहकारी बँकावर दंडात्मक कारवाई केली होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेने एका निवदेनात म्हटले आहे की, ‘ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड’ बँकेला आरबीआयने १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारात ग्राहकांच्या हिताबाबत वेळीच लक्ष न दिल्यामुळे रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव बँक, झांसी या बँकेला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. ‘सुपरवायजरी अॅक्शन फ्रेमवर्क एसएएफ’च्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.
एक्सपोजर नियम आणि वैधानिक, यूसीबीअंतर्गत इतर निर्बंधाअंतर्गत जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निकोलनस कॉ-ऑपरेटिव्ह टाउन बँक, तंजावुर जिल्हा, तमिळनाडू सदर बँकेवर आयबीआयने २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिक्षण आणि जागरूकता निधीशी संबंधित नियामांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरी सहकारी बँक, राउरकेला येथील बँकेवर १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने नियामक अनुपालनातील त्रुटींबद्दल दंड आकारला आहे.