
शिबानी जोशी
आपल्या संस्कृतीमध्ये सत्पात्री दानाला खूप महत्त्व आहे. अवयव दानाचे दाखले आपल्याला प्राचीन काळापासून आढळतात. दधिची ऋषी, कर्णाची कवचकुंडले किंवा आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा ही सर्व अवयव दानाची रूप मानायला हवीत. याचं महत्त्व ओळखून संघाच्या चेन्नईमधल्या एका प्रचारकाने नेत्रदान करायचं असं लिहून ठेवले होते. चेन्नई येथे संघाच्या कार्यालयावर १९९३ साली बॉम्बहल्ला झाला होता आणि हल्ल्यात त्या प्रचारकाचं निधन झालं. त्यांनी नेत्रदान केले ही बाब त्यावेळेस प. पूजनीय पूर्व सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंह तिथे गेले असताना त्यांना लक्षात आली आणि त्यांनी नागपूरला आल्यानंतर ही गोष्ट काही संघ कार्यकर्त्यांना सांगितली. नेत्रदानाची गरज ओळखून आपणही नेत्रपेढी का सुरू करू नये? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावेळी धरमपेठ महाविद्यालय नागपूरचे प्राचार्य व रा. स्व. संघ नागपूरचे मा. संघचालक श्री विनायकराव जी फाटक यांच्यासमोर हा मुद्दा मांडण्याला आला. त्याचवेळी महाविद्यालयात बॉटनी विशयाचे प्राध्यापक डॉ. अविनाश चंद्र अग्निहोत्रीही उपस्थित होते. त्यांनी अशा प्रकारची नेत्रपेढी सुरू करण्याची योजना तयार केली.
संघातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठरविण्यात आले की, रा. स्व. संघाचे संस्थापक व प्रथम प.पूजनीय आद्य सरसंघचालक डाॅ. केशवराव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीत १९९३ला डॉ. हेडगेवार रक्तपेढीची स्थापना झाली म्हणून याच अानुषंगाने रा. स्व. संघाचे द्वितीय प.पूजनीय सरसंघचालक श्रद्धेय माधवराव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य ‘श्री गुरुजी’ यांच्या पावन स्मृतीमध्ये माधव नेत्रपेढी असे नाव देण्यात आले आणि ‘श्री गुरुजी’ यांच्या जन्मदिनी विजया एकादशी, शनिवार दि. २५ फेब्रुवारी १९९५ रोजी माधव नेत्रपेढी या सामाजिक प्रकल्पाची विधिवत मुहूर्तमेढ रोवली गेली.
या उद्घाटन कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे पूर्व प.पू. सरसंघचालक श्रद्धेय बाळासाहेब देवरस उपस्थित होते. त्यांनी स्वतः नेत्रदान संकल्पपत्र भरून या कार्याची सुरुवात केली आणि निर्वाणानंतर त्यांचे नेत्रदानही करण्यात आले. नेत्रदान (कॉर्निया दान) झाले की, त्याची जपणूक करण्यासाठी सोय नसल्यामुळे नागपूरमधील इतरत्र विविध रुग्णालयांत ती केली जायची; परंतु ही बाब अत्यंत खर्चिक होती. त्यामुळे नेत्रचिकित्सा करण्यासाठी एक नेत्रालय बांधण्याची गरज निर्माण झाली आणि २०१४ साली तत्कालीन मा. सरकार्यवाह सुरेशराव (भय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट या विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर संस्था जागेच्या शोधात होती. साडेसहा एकर जागा दानशूर संस्थेने देऊ केली; परंतु त्याच दरम्यान एका सद्गृहस्थाने त्यांचं नाव जाहीर न करण्याच्या विश्वासावर १९ कोटी रुपये देऊन शहराच्या मध्यवर्ती भागात एक जागा उपलब्ध करून दिली आणि त्यावर केवळ ११ महिन्यांत बांधकाम पूर्ण करून १०१८ साली अत्याधुनिक सोयींनी युक्त असे माधव नेत्रालय सुरू करण्यात आले.
आतापर्यंत माधव नेत्रालय संचालित माधव नेत्रपेढीद्वारा ११५८० जणांनी नेत्रदान संकल्प पत्र भरली आहेत तसेच अंदाजे ३१७५ कॉर्निया प्राप्त करून त्यातून अंदाजे १४०० कॉर्निया प्रत्यारोपणाद्वारे नेत्र दृष्टी प्राप्त झाली आहे. माधव नेत्रालय नेत्रदानाला प्रोत्साहन देण्याकरिता अहोरात्र झटत आहे. नेत्रदान करणाऱ्या कुटुंबीयांना स्मृतिचिन्ह देऊन सम्मानित करण्यात येते. असे म्हणतात की, प्रामाणिक आणि सच्चे कार्य असेल, तर हजारो हात पाठीशी उभे राहतात. हे त्यावेळी लक्षात आले, ज्यावेळी अनेक सेवाभावी संघटना, सीएसआर फंडमधून सढळ हस्ते दान प्राप्त झाल्यावरच माधव नेत्रालय सिटी सेंटरची अद्ययावत अशी पाच मजली इमारत उभी राहिली.
१८ मार्च २०१८ ला टर्शरी आय केअर व अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा माधव नेत्रालय, नेत्र संस्थान एवं अनुसंधान केंद्र, नागपूरचे उद्घाटन करण्यात आले. आता अंदाजित १०० नेत्ररुण दररोज इथे नेत्रसंबंधी समस्यांवर उपचार होतात. आर्थिकरीत्या कमकुवत असणाऱ्या रुग्णांना अल्प दरात उपचार पुरविले जातात. अत्याधुनिक कॉन्टॅक्ट लेन्स उपचार केंद्र, बाल शिशू नेत्रचिकित्सा, फेमटो लेसिक मशिनीद्वारे नेत्रचिकित्सा, आधुनिक काचबिंदू उपचार केंद्र, कॉर्निया व रिफ्रॅक्टिव शल्यचिकित्सा, रेटिना, वीट्रियस एवं पोस्टीरियर सेगमेंट रोगांची चिकित्सा, अल्पदृष्टी उपकरण व आधुनिक कॉन्टॅक्ट लेन्स उपचार केंद्र, ऑपरेशन थिएटर, दिवसा राहण्याची सोय, पॅथॉलॉजी लैब, फार्मसी, ऑप्टिकल शॉप, ओपीडी अशा सोयी उपलब्ध आहेत.
माधव नेत्रालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात प.पू. स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, प. पू. स्वामी गोविंद गिरीजी महाराज, रा.स्व. संघाचे परम पूजनीय सरसंघचालक मोहन जी भागवत, तत्कालीन मा. सरकार्यवाह सुरेशराव (भय्याजी जोशी, जे. पी. नड्डाजी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते. प. पूजनीय माधवराव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य ‘श्री गुरुजी’च्या नावाने सुरू झालेल्या माधव नेत्रपेढीत विनामूल्य नेत्र प्रत्यारोपण (कॉर्निया) शस्त्रक्रिया केली जाते. बाहेर या शस्त्रक्रियांना ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन मार्डिकर, प्रबंध संचालक मेजर जनरल अनिल बाम (सेवानिवृत्त) हे सुद्धा विनामूल्य सेवा देतात. एक वेळ अशी होती की, नागपूर किंवा विदर्भातल्या नेत्ररुग्णांना चेन्नई किंवा हैदराबादला शस्त्रक्रिया करण्यासाठी जावं लागत असे. त्यांना आज नागपूरमध्ये डोळ्यांच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ‘संकल्प से सिद्धी’ असा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. परोपकार आणि लोकसेवेच्या भावनेने हे नेत्रालय उभारलेले असल्यामुळे इथे नफा कमाविणे हा उद्देश नसल्याचे माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव डॉ. अविनाश चंद्र अग्निहोत्री सांगतात. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय रुग्णांना निःशुल्क व विविध सेवा मॉडल अंतर्गत, अनुदानित उपचार दिले जातात.
परम पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही नुकतीच या नेत्रालयात करण्यात आली. आज अनेकांना माहीत नसेल; परंतु तत्कालीन प्रो. प. पू. सरसंघचालक राजेंद्र सिंह, श्रद्धेय बाळासाहेब देवरस, प.पू. सरसंघचालक सुदर्शनजी यांनी नेत्रदान केले आहे. त्याचप्रमाणे सरकार्यवाह हो. वे. शेशादी, दत्तोपंतजी ठेंगडी, मोरोपंज पिंगळे यांनीही मरणोत्तर नेत्रदान केले. जिवंतपणी लोकसेवेला वाहून घेतलेल्या संघाच्या या महान नेत्यांनी मरणोत्तरही समाज सेवेची परंपरा सुरूच ठेवली, असे माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष निखिलजी मुंडले यांनी आवर्जून सांगितले. अशा प्रकारचे अभिनव दान एखाद्या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाने खचितच केले असेल. केवळ डोळ्यांचे उपचार करणारी अद्ययावत नेत्र रुग्णालये हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतील.