नालासोपारा (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी अंधेरी येथील शाळकरी मुलीचा मृतदेह नायगाव येथे सापडला होता. याप्रकरणामुळे एकच खळबळ माजली होती. सध्या या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असली तरी आता नव नवीन खुलासे बाहेर येत आहे. या १५ वर्षीय मुलीची हत्या होण्यापूर्वी आरोपीमधील एकाने आपल्याच घरातील पाच तोळ्याचे दागिने चोरले होते. अशी माहिती आता समोर आली आहे. याप्रकरणी वालिव पोलिसांनी मुलीचा प्रियकर संतोष मकवाना आणि त्याचा मित्र विशाल अंभवणे या दोघांना गुजरातच्या पालनपूर येथून अटक केली आहे.
२६ ऑगस्टला अंधेरी येथे राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह नायगाव येथील झुडपात मिळाला होता. यावेळी पोलिसांनी आपली चक्र फिरवून आरोपींची अवघ्या काही तासांमध्ये ओळख पटवली होती. सदर हत्या या मुलीचा प्रियकर संतोष मकवाना याने केल्याचे निष्पण् झाले होते. या मुलीची ओळख आरोपी संतोष मकवानाबरोबर समाजमाध्यमावर झाली होती.
आरोपी मकवाना हा बेरोजगार होता. मुलीच्या कुटुंबीयांना त्यांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या आईने आणि बहिणीने संतोष याला दमदाटी केली होती, तसेच पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्याने एक आठवड्यापूर्वी प्रेयसीच्या हत्येची योजना बनवली होती. संतोषने या कटात त्याचा मित्र विशाल अंभवणे याला सोबत घेतले होते. हत्येच्या एक आठवड्याआधी या दोघांनी ही योजना बनवली होती.
विशालने आपल्या घरातून आईचे पाच तोळे दागिने चोरले होते. त्याचे त्यांना दीड लाख रुपये मिळाले होते. २५ ऑगस्ट रोजी मकवाना याने त्याच्या प्रेयसीला विशालच्या जुहू येथील घरी बोलावले. दुपारी सव्वाबारा वाजता ती घरात आली. त्या वेळी मकवाना याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर ती बेसावध असताना तिची दोघांनी मिळून चाकूचे वार करून हत्या केली.
पोलीस उपायु्क्त संजयकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरिक्षक राहुल पाटील (गुन्हे) आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.