वाडा (वार्ताहर) : पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्यात लम्पी त्वचारोगाची लागण असंख्य जनावरांना झाली असतानाच, त्याचा शिरकाव वाडा तालुक्यातही झाला आहे. दिनकर पाडा या गावातील शेतकरी वैभव चौधरी यांच्या जनावरांना लंम्पी त्वचारोगाची लक्षणे असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. तसेच शेती कामासाठी पशुधनाचा वापर केला जातो. त्यामुळे तालुक्यात जनावरांची संख्या बऱ्यापैकी आहे. सध्या पावसाळा असल्याने हिरवा चारा जनावरांना मिळत असल्याने दुधाचे प्रमाणही वाढते आहे. मात्र लम्पी त्वचा रोगाचा संशयित जनावर आढळून आल्याने शेतकरी भयभित झाले आहेत.
दिनकर पाडा येथील शेतकरी वैभव चौधरी यांचा दुग्धव्यवसाय हा जोडधंदा असून त्यांच्याकडे अनेक जनावरे आहेत. त्यातील एका गाईच्या अंगावर गाठी येणे, खाणे कमी होणे, पायाला सूज येणे अशी लक्षणे दिसून आली असल्याने त्यांनी तत्काळ कुडूस चे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. शरद अस्वले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संशयित गाईच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहिती अस्वले यांनी दिली आहे. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच लम्पी रोग आहे की इतर कोणता आजार याची माहिती मिळू शकेल असे सांगण्यात येत आहे.