मुंबई (वार्ताहर) : भारताचा प्रतिभावंत धावपटू अविनाश साबळे याने आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकाराची रेस आठ मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रस्तावित ३ हजार मीटर स्टीपलचेस रेस ८ मिनिटांमध्ये पूर्ण करू शकलो तर २०२४ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्या आशा पल्लवीत होतील. २०२३ मधील हंगामाच्या सुरुवातीपासून ८ मिनिटे आणि ५ सेकंदांपर्यंत वेळ आणून वर्ल्ड चँपियन्सशीपमध्ये लक्ष्याच्या आसपास पोहोचण्याला माझे प्राधान्य असेल. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकानंतर माझा आत्मविश्वास उंचावला आहे.
आशियाई स्पर्धेतही मी सर्वोत्तम कामगिरीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, वर्ल्ड चँपियन्सशीपमध्ये पदकावर मोहोर उमठवण्यास उत्सुक आहे. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे अविनाश याने सांगितले. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत बीडच्या या खेळाडूने प्रस्तावित ३ हजार मीटर स्टीपलचेस अंतर ८ मिनिटे आणि ११.२० सेकंदांमध्ये पार करून रौप्यपदकाला गवसणी घातली. २०२२ ऑलिम्पिकमधील कामगिरी (८:१८:१२ सेकंद) पाहता त्याने जवळपास सहा सेकंद आधी रेस पूर्ण करताना स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडला.
पाच वर्षांच्या कारकीर्दीत केवळ दोन पदके कमी वाटतात का, असे विचारले असता, मी आधी लष्कराच्या सेवेत (आर्मी) रूजू झालो. त्यानंतर अॅथलेटिक्स कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यामुळे स्पोर्ट्स करियर थोडे उशीराने सुरू झाले. त्याच दुखापतीमुळे मला २०१८ आशियाई स्पर्धेला मुकावे लागले. त्या स्पर्धेत सहभागी झालो असतो तर पदक निश्चित मिळवले असते. २०१७ मध्ये करियरला सुरुवात झाली आणि पुढच्याच वर्षी मेडल मिळाले असते तर लवकर मिळाले म्हणून त्याचे महत्त्व थोडे कमी झाले असते. मात्र, दुखापतीतून खूप काही शिकलो. खूप मेहनत घेतली. गेल्या महिन्यात बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवल्याने मेहनत फळाला आली.