देशाचे केंद्रीय मंत्री व भाजपचे मातब्बर नेते अमित शहा हे गणेशोत्सवामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी मुंबई भेटीवर आले. गेली १५ वर्षे अमित शहा दरवर्षी लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवातील गणेश दर्शनाला नित्यनियमाने येतच असतात. राजकारणात अजातशत्रू व भाजपाविरोधक ज्यांना मनापासून घाबरतात असे कणखर नेतृत्व अशी अमित शहांची देशाच्या राजकारणात अलीकडच्या काळात प्रतिमा निर्माण झालेली आहे. दरवर्षीचे अमित शहांचे गणेश दर्शन व यंदाचे गणेश दर्शन यात गणेशभक्ती, गणेश दर्शन यात साम्य राहणार असले तरी या भेटीला धार्मिकतेसोबत संभाव्य राजकीय वादळाची झालरही असणार, याची राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती आणि सोमवारी दिवसभरात घडलेल्या घडामोडी पाहिल्यावर ती संभाव्य शक्यता खरी ठरली. ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा वाद घालत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर शब्द दिल्याचे सांगत अमित शहांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला, त्याच शिवसेनेची अंतर्गत वादामुळे फाटाफूट झाली असून उद्धव ठाकरेंना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे.
शिवसेनेच्या एका मातब्बर गटाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर व हिंदुत्वविरोधी शक्तींशी सत्तेसाठी केलेली दिलजमाई यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत शिवसेनेतच राहून वेगळी चूल मांडली आणि भाजपच्या सोबतीने एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ता संपादन केली. त्यातच आता मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणे हे भाजपचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे. शिवसेनेसोबत युती करून भाजपने उपमहापौर पदासह अनेक पदे उपभोगली असली तरी स्वबळावर सत्ता आणि भाजपचाच महापौर हे स्वप्न भाजपला आजतागायत साध्य करता आलेले नाही. त्यामुळे अमित शहांच्या गणेश दर्शनानिमित्त झालेल्या मुंबई भेटीत महापालिका निवडणुकीसाठी भाजप आक्रमक रणनीती आखणार असल्याचे संकेत आजच प्राप्त झाले आहेत.
तसेच उद्धव ठाकरेंबाबत बोलताना विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या तसेच युतीबाबतच्या चर्चेदरम्यान शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा आपण कधीही शब्द दिला नसल्याचे अमित शहांनी स्पष्ट केले. त्यातच सध्या शिवसेनेची जी राजकारणात तसेच संघटनात्मक पातळीवर अवस्था झालेली आहे, त्याला शिवसेनेतील अंतर्गत वाद व शिवसेना नेत्यांची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाप्रतीची नाराजी आणि हिंदुत्वाच्या भूमिकेपासून लांब जात सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी केलेला मनोमिलाफ शिवसेना आमदार-खासदारांच्या पचनी न पडल्याने आज राजकारणात व संघटनेत ठाकरे एकाकी पडले आहे. त्या घडामोडींमागे भाजपचा काहीही संबंध नसल्याचे अमित शहांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना अंतर्गत पातळीवर खिळखिळी झाल्याने तसेच ठाकरेंच्या तळापासून विधानसभा-लोकसभेपर्यंतच्या सर्वच शिलेदारांनी त्यांना जय महाराष्ट्र केल्याने ठाकरे एकाकी पडले आहेत. भाजपला यंदा कधी नव्हे ती मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे अमित शहांनी मुंबई भेटीमध्ये मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन-१५०’ची घोषणा केलेली आहे. त्यातच शिंदे गट भाजपच्या सोबतीला असल्याने भाजपला यंदा स्वबळावर सत्ता संपादन करताना व महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान करताना तारेवरची कसरत साध्य करावी लागणार आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा सत्तेत सहभागी न होता भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेला सत्ता संपादन करणे सोपे झाले. सत्तेत सहभागी न होता केवळ आपण पहारेकऱ्याची भूमिका बजावणार असल्याचे भाजपने त्या काळात भूमिका स्पष्ट केली होती. अखेरपर्यंत शिवसेना-भाजपची युती तुटेपर्यंत भाजपने तो शब्द खरा केला. अमित शहा यांनी मुंबई भेटीत आपण मुख्यमंत्रीपदाबाबत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला कोणताही शब्द दिला नसल्याचे स्पष्ट केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी व फडणवीसांच्या नावावर शिवसेनेने स्वत:चे खासदार व आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत ठाकरे यांनी केवळ भाजपलाच नाही, महाराष्ट्राच्या जनतेलाच धोका दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पर्यांयाने महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत राजकीय स्वार्थासाठी खंजीर खुपसला आहे. खंजीर खुपसणाऱ्यांना व धोका देणाऱ्यांना माफी कदापि मिळणार नाही. याची ठाकरेंना शिक्षा मिळालीच पाहिजे. भाजपला आता स्वबळावर सत्ता संपादन करायची असून भाजपचाच महापौर मुंबई महापालिकेवर विराजमान करायचा आहे, त्यासाठी आता भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. ठाकरेंना आता जमिनीवर आणले पाहिजे, असे सांगत अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आक्रमकपणे सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा हेच भाजपचे दोन प्रमुख चेहरे आहेत. मोदींच्या चेहऱ्यावर आणि केंद्र सरकारच्या कामावर अलीकडच्या काळात मतदान केले आहे. मोदी हे भाषणाच्या माध्यमांतून मतदारांना आपलेसे करत असले तरी निवडणुकीसाठीची रणनीती व मोर्चेबांधणी हा प्रामुख्याने अमित शहांच्याच कार्यप्रणालीचा भाग असतो, हे अनेकांनी जवळून पाहिले आहे. आजच्या भेटीत अमित शहांनी ठाकरेंवर केलेला हल्लाबोल पाहता अमित शहांच्या मनात शिवसेनेबाबतचा राग स्पष्टपणे दिसून आला. मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरेंचा असत्यपणा उघडकीस आणताना शिवसेनेने गद्दारी केल्याचा व धोका दिल्याचा संताप अमित शहांच्या बोलण्यातून दिसून आला. भाजप आता आक्रमक झालीआहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची व महापौर बसविण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. अमित शहांनी मुंबई भेटीत आपले मनसुबे स्पष्ट केले आहे. ठाकरेंप्रतीचा असंतोष व्यक्त करत त्यांनी केलेल्या गद्दारीचा वचपा काढण्याचा त्यांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात राजकीय पटलावरील कुरूक्षेत्रामध्ये जोरदार ‘घमासान’ होण्याची चिन्हे आताच निर्माण झाली आहेत.