Friday, May 9, 2025

महामुंबई

मढच्या समुद्र किनाऱ्यावर रंगणार कुस्तीचे सामने

मढच्या समुद्र किनाऱ्यावर रंगणार कुस्तीचे सामने

मुंबई : सध्याच्या काँक्रीटीकरणाच्या जगतात,मालाड पश्चिम मढ कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. शिळा सणाची मढच्या कोळीवाड्यातील नागरिकांना प्रतीक्षा असते. मढ कोळीवाड्यात १९५४ पासून गौरी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शिळा सण साजरी गेल्या ६८ वर्षांची परंपरा आहे.


गौरी गणपतीच्या काळात मासेमारीतून येथील कोळी समाजाला थोडी विश्रांती मिळते. येथील सर्व गावकरी एकत्र येऊन शिळा सण साजरा करतात अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली. सालाबाद नुसार उद्या मंगळवार संध्याकाळी ६.०० वाजता नवजवान तरूण मंडळाच्या वतीने गौरी-गणपती (शिळा सणा) निमित्त मढ कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यावर कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित केले आहेत. यावेळी विजेत्या पेहलवानांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.


या सणासाठी खास खरेदी केलेल्या रंगबिरंगी साड्या, ब्रास बँड आणि बँजो पथकाच्या तालावर कोळी महिलांचे पारंपरिक नृत्य, कुस्त्यांचा फड, यावेळी हजेरी लावणारे दूरदूरचे मल्ल असा जल्लोष येथे खास बघायला मिळतो अशी माहिती नवजवान तरूण मंडळाचे अध्यक्ष उपेश कोळी यांनी दिली.


शिळा सण साजरा करण्यासाठी संध्याकाळी येथील वेगवेगळ्या मंडळांच्या महिला रंगबिरंगी साड्या परिधान करून ब्रास बँडच्या आणि बेंजो पथकाच्या तालावर नाचत,वाजत, गाजत समुद्रकिनारी एकत्र येतात. येथील बँड पथक व बेंजोच्या तालावर कोळी महिला नृत्याचा फेर धरतात. सूर्य अस्ताला गेल्यावर मढमध्ये कुस्त्यांचे फड रंगतात.

Comments
Add Comment