Tuesday, April 29, 2025

विशेष लेखसंपादकीयमहत्वाची बातमी

लाभले आम्हास भाग्य... ‘शिक्षक’ असण्याचे

लाभले आम्हास भाग्य... ‘शिक्षक’ असण्याचे

डॉ. साधना कुलकर्णी

एकूण शिक्षण प्रक्रियेबद्दल प्रत्येक शिक्षकाने आत्मपरीक्षण करावं अशी आजची परिस्थिती आहे. एक सुसंस्कारित, सुशिक्षित, नागरिक घडवण्याची मोठी जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता आपल्यात आहे का, याचं आत्मपरीक्षण प्रत्येक शिक्षकाने शिक्षकदिनाच्या निमित्ताने अवश्य करायला हवं. हल्लीच्या ‘स्मार्ट’ शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी दोघंही ‘स्मार्ट’ असल्याने हे आत्मपरीक्षणही स्मार्ट झालं नाही तरच नवल!

मध्यंतरी एका व्यासंगी आणि सुप्रसिद्ध वक्त्यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. व्याख्यानाच्या आरंभी ते म्हणाले, ‘आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे, त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांना जातं’. आता या वाक्यात वेगळं असं काहीच नाही. सामान्यतः अनेक विद्वान, कर्तृत्ववान व्यक्तींच्या जडणघडणीत त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतोच. पण खरी मेख पुढेच आहे. वरचं विधान करून दोन क्षण वक्त्यांनी विराम घेतला आणि म्हणाले, ‘मी त्या शिक्षकांना माझ्या यशाचं श्रेय देतो, ज्यांनी मला कधीच शिकवलं नाही. ज्यामुळे मी स्वअध्ययन करण्यास प्रवृत्त झालो...’ शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मला हा प्रसंग आठवला. मी स्वतः एक शिक्षक असल्याने वरील विधानाचा सगळ्या बाजूंनी सांगोपांग विचार केला. खरं तर प्रत्येक शिक्षकाने आत्मपरीक्षण करावं असं हे विधान आहे. ए्य्य्य+-शक सुसंस्कारित, सुशिक्षित, संवेदनशील नागरिक घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची क्षमता आपल्यात आहे का, याचं आत्मपरीक्षण प्रत्येक शिक्षकाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने अवश्य करायला हवं. पण हल्लीच्या ‘स्मार्ट’ शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी दोघंही ‘स्मार्ट’ असल्याने हे आत्मपरीक्षणही स्मार्ट झालं नाही तरच नवल. हे कसं काय, असा प्रश्न पडला असेल नाश? पण उत्तर सोपं आहे... ‘ओटीडी’द्वारे हो. आम्हा महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रत्येकाचा एक ‘ऑनलाइन टीचर डाटाबेस’ असतो. त्यात आपली इत्थंभुत कुंडली मांडलेली असते. वेळोवेळी आपण केलेले उपक्रम - उदा. लेखन, व्याख्यान, प्रकल्प इत्यादी त्यात ‘अपलोडायचे’ असतात. जितके जास्त अपलोड, तितका शिक्षक भारी. ‘ओटीडी’ हा शिक्षकाचा आत्माच की हो... ‘स्मार्ट’ आत्मा बरं का... खरंच डिजिटल युगाने, वेगवान काळाने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. मग शैक्षणिक क्षेत्र त्याला अपवाद कसं राहणार? शिक्षक केंद्रित शिक्षण आता जुनं झालं आहे. त्याऐवजी विद्यार्थी केंद्रित शिक्षण हे योग्य मानलं जातं. त्याही पुढे जाऊन आजचं शिक्षण हे परीक्षा केंद्रित शिक्षण आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्रचंड संख्येत वाढलेल्या खासगी शाळा - महाविद्यालयं, मोठमोठ्या शिक्षणसंस्था, संस्थापूरक ध्येयधोरणं, बदललेली शिक्षणपद्धती, शाळांचं कॉर्पोरेट स्कूल आणि पब्लिक स्कूलमध्ये झालेलं रूपांतर, सतत चालणाऱ्या परीक्षा, वारेमाप शिक्षणशुल्क, गल्लीबोळात उगवलेले कोचिंग क्लासेस, शिक्षकांवर लादलेले अतिरिक्त उपक्रम या सगळ्यामुळे आजचा शिक्षक हा ओझं वाहणारा भारवाही झाला आहे. त्याच्यातला प्रामाणिक शिक्षक अर्धमेला होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. भरीला पालकांच्या पाल्यांबद्दलच्या अवास्तव अपेक्षा. ती जबाबदारीही शिक्षकांचीच. परिणामी, शिक्षक-विद्यार्थी हे नातं कोरडं आणि रुक्ष होत चाललं आहे. शालेय शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात तुलनेने आपुलकी आणि जिव्हाळा टिकून आहे. पण कोरोनाच्या धुमाकुळामुळे शाळेत ऑनलाइन शिक्षणाचा प्रवेश झाला आणि नात्यातली ही ओलही आता आटते की काय, अशी भीती वाटते. ‘गुगल’सरांनी शालेय शिक्षणातही चंचुप्रवेश केलाय. महाविद्यालयीन विद्यार्थी तर ‘गुगल विद्यापीठच’ खिशात घेऊन फिरत असतात. त्यांना शिक्षकाची गरजच नसते. महाविद्यालयीन शिक्षक बरेचदा ‘उरलो सही करण्यापुरता’ अशा स्थितीत असतात.

पूर्वीसारखे शिक्षक आणि पूर्वीसारखे विद्यार्थी आता राहिलेच नाहीत, अशी ओरड हल्ली नेहमीच होत असते. ही वस्तुस्थिती खरी असली तरी सगळं चित्र नकारात्मक नक्कीच नाही. आजही हाडाचे असंख्य शिक्षक विद्यादानाचं कार्य तळमळीने करत आहेत. आणि असंख्य विद्यार्थी आयुष्यभर अशा शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करत आहेत. शिकवण्याच्या, शिकण्याच्या पद्धती बदलल्या, तंत्र बदललं, संगणक आले तरी शिक्षकाची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. शिक्षण ही एक चैतन्यपूर्ण अशी सजीवांकडून सजीवांवर घडून येणारी विकासाची प्रक्रिया आहे. तत्व, पद्धती, तंत्र, साधन, साहित्य, पुस्तकं या सगळ्या निर्जीव गोष्टी. शिक्षक आपल्या स्पर्शाने त्यात चैतन्य निर्माण करत असतो. त्यामुळे शिक्षकाचं स्थान नेहमीच अनन्यसाधारण होतं आणि राहील. ‘द आर्ट ऑफ गिविंग टू ह्युमन पॉवर्स अँड अॅडप्टींग देम टू सोशियल सर्विस इज द सुप्रम आर्ट ऑफ एज्युकेशन’ असं प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ ’जॉन ड्युई’ने म्हटलं आहे. मानवी शक्तींना वळण लावून समाजकार्यासाठी सक्षम करणं हे शिक्षणाचं सर्वोच्च उद्दिष्ट लक्षात घेण्याची गरज आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने नव्याने समजून घ्यायला हवी. फक्त अभ्यासक्रमाला बांधून न घेता, चौकटीबाहेरच्या शिक्षणालाही शिक्षकाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आज परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षकाने सकारात्मक राहून ‘सक्सेसफूल टिचिंग इज ए टिचिंग दॅट ब्रिंग्ज अबाऊट इफेक्टीव्ह लर्निंग’ या ‘मर्सेल’च्या व्याख्येवर विश्वास ठेवून शिक्षक असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे.

शिक्षक हा राष्ट्रपतीपेक्षाही मोठा असतो याचं भान दिलं ते ‘सर्वपल्ली राधाकृष्णन’ यांनी. उत्कृष्ट अध्यापन, इंग्रजीवरील असाधारण प्रभुत्व, अलौकिक वक्तृत्व, तत्त्वज्ञानाचा प्रगाढ व्यासंग असणाऱ्या डॉ. राधाकृष्णन यांनी अध्यापनाचा आरंभ मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजपासून केला. त्या नंतर म्हैसूर, कलकत्ता इथेही त्यांनी विद्यादानाचं कार्य केलं. ते १९३१ ते १९३५ दरम्यान आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यानंतर ऑक्स्फर्ड विद्यापीठात ‘स्पाँडलिंग प्रोफेसर’ या पदावर त्यांची नियुक्ती झाली. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होत. १९३८ ते १९४७ पर्यंत त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचं कुलगुरूपद स्वीकारून या विद्यापीठाला उंचीवर नेऊन ठेवलं. डॉ. राधाकृष्णन हे नुसतेच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक नव्हते, तर श्रेष्ठ तत्त्वज्ञ होते. त्यांची मर्मदृष्टी आणि मूलग्राही चिंतन त्यांच्या विविध देशांमधल्या व्याख्यानांमधून आणि ग्रंथसंपदेमधून निर्विवाद सिद्ध झालं आहे. ‘मी परदेशात शिकायला जाणार नाही तर शिकवायला जाईन...’ हे आपले विद्यार्थीदशेतले उद्गार त्यांनी सिद्ध करून दाखवले.

१९४९ मध्ये ते रशियात राजदूत म्हणून गेले. १९५२ पासून ते दहा वर्षं उपराष्ट्रपती होते. १९६२ मध्ये ते राष्ट्रपतीपदावर आरूढ झाले. राष्ट्रपती झाल्यावर आपला जन्मदिवस हा ‘शिक्षक दिन’ म्हणून मानला जावा, अशी सूचना त्यांनी राष्ट्राला केली. अत्युच्च पदावर असतानाही त्यांना स्वतःमधल्या शिक्षकाचं विस्मरण झालं नाही. चाळीस वर्षं ‘शिक्षक’ म्हणून आपण केलेलं कार्य श्रेष्ठ आणि मौलिक आहे, अशी त्यांची धारणा होती. ‘पाच सप्टेंबर रोजी माझे गुणगान न करता शिक्षकांचा सन्मान करा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा’, असा संदेश देऊन त्यांनी शिक्षक आणि शिक्षण व्यवसाय उदात्त पातळीवर नेऊन ठेवला.

आज आपल्यातल्या शिक्षकाचं खच्चीकरण होईल असे प्रसंग अनेकदा येतात. शिकवणं निरर्थक वाटू लागतं. पण अशा वेळेस मला माझ्या शाळेतल्या मराठेबाई आठवतात. कॉलेजमधले जोशी सर आठवतात. शिकवतानाची त्यांची तळमळ आताही तीव्रतेने जाणवते. मनातलं वैफल्य, उदासीनता नष्ट करण्याची शक्ती त्यांनी केलेल्या संस्कारात आहे, याची प्रचिती येते. आजही शाळा कॉलेजमधले शिक्षक अप्रत्यक्षरीत्या प्रेरणा देतातच. अगदी पुलंचे चितळे मास्तर ही येतात मदतीला... पुलंच्याच शब्दात सांगायचं झाल्यास ‘पहिली, दुसरीच्या वर्गाबाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चाललं आहे की, पोरं ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणत आहेत, ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती, ‘आय?’ ‘गो’, ‘यू?’ ‘गो’, ‘वुई’ ‘गो’, ‘ही?’ ‘गोऽज’ची चाल आठवते. मास्तर इंग्रजी साभिनय शिकवायचे. तुरूतुरू चालत, ‘आय ऍम’ की पोरं ‘वॉऽऽकिंग’ म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून, डोळे मिटून पडत आणि म्हणत, ‘आय ऍम??’त्यावर ‘स्लीऽऽपिंग’अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागं झाल्यासारखं उठून, ‘गाढवांनो, माझी झोप मोडलीत?’ म्हणत... आजही अनेक शाळांमध्ये असे अनेक, ‘ये हृदयीचे ते हृदयी’ देणारे, आयुष्याला पुरून उरणारे असंख्य चितळे मास्तर आहेत, जे जीव तोडून शिकवत आहेत आणि आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या हृदयात जिवंत आहेत, आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याने कायम बांधले आहेत.

महान शिक्षणतज्ज्ञांचा शिक्षणाविषयीचा व्यापक दृष्टिकोन आज आपल्याला स्वतःमध्ये रुजवायचा आहे. मी शिक्षक आहे. परीक्षेच्या-अभ्यासक्रमाच्या पलीकडे, पुस्तकांच्या, तंत्रांच्या पलीकडे माझ्याजवळ बरंच काही आहे, जे मी प्लेटोच्या व्याख्येनुसार माझ्या विद्यार्थ्यांना देऊ शकते हा आत्मविश्वास आजच्या दिवशी आपण समस्त शिक्षकांनी मनात रुजवू या आणि हा पवित्र व्यवसाय करण्याच्या संधीचं सोनं करू या.

Comments
Add Comment