
मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार
भाजपच्या 'मिशन मुंबई'ला सुरुवात
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागचा राजाच्या दर्शनाने मुंबई दौऱ्याचा शुभारंभ केला. निमित्त दर्शनाचे असले, तरी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेतून 'विसर्जन' करण्याचे शाहांचे उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने 'मिशन मुंबई'ला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर 'मेघदूत' बंगल्यावर मुंबईतील भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शाहांनी १५० जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने २०१४ मध्ये युती तोडली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. ठाकरेंनी आम्हाला धोका दिला, त्यांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे अमित शाह यावेळी पदाधिका-यांना म्हणाले. मुंबईवर फक्त भाजपचेच वर्चस्व राहिले पाहिजे असे निर्देशही शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाल्याचे म्हणत फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांचे नाव वापरुन निवडून आले आणि ऐनवेळी आम्हाला धोका दिला. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. त्या उद्धव ठाकरेंना जमिन दाखवण्याची वेळ आता आली आहे. खयाली पुलावामुळे शिवसेनेची सध्याची अवस्था झाल्याचे शाह म्हणाले.
आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केले नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला. राजकारणात धोका देणाऱ्यांचे राजकारण यशस्वी होत नाही. एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ते आपल्यासोबत आहेत. राजकारणात धोका सहन करू नका, असे म्हणत बीएमसी जिंकण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचे असून, मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. आपली ही शेवटची निवडणूक आहे असे समजा, कारण अभी नही तो कभी नही, असे शाहा म्हणाले. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिशन १३५ ची घोषणा केली. 'मेघदूत' बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, याशिवाय नितेश राणे, अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा आदि नेते उपस्थित होते.